हिमायतनगर महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्याचा अजब कारभार... वीज चोरांना सवलत तर नियमित वीज भरणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी -NNL

तीन दिवसांपासून गावं अंधारात असल्याने संतप्त कोठातांडा वासीय धडकले हिमायतनगर महावितरण कार्यालयावर


हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार|
हिमायतनगर महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्याचा अजब कारभार समोर आला आहे, बिनदिक्कतपणे मुख्य वीज प्रवाहावर आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या अनेक चोरांना सवलत दिली जात असून, नियमित वीज भरणा करून वीजपुरवठयाची मागणी करणाऱ्या वीजग्राहकांना चक्क जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोप गोरसेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद राठोड यांनी केला आहे.


हिमायतनगर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महावितरण विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता व लाईनमन कर्मचारी यांनी मनमानी कारभाराची सीमा गाठली आहे. ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या विज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवीलेला आहे. एवढेच नाही तर नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना देखील सुरळीत विविध पुरवठा दिला जात नाही.  त्यामुळे नियमितपणे विजेची देयके भरणाऱ्या ग्राहकाच्या महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र सांताप व्यक्त केला जात आहे. असाच प्रकार दिनांक 6 डिसेंबरच्या रात्री समोर आला असून, गेल्या तीन दिवसापासून अंधारात राहावे लागत असल्याने तालुक्यातील नदी काठावरील मौजे कोठा तांडा येथील वीजग्राहकांनी रात्री नऊ वाजता हिमायतनगर येथील उपविभागीय महावितरण कार्यालयावर धडक दिली आहे.


वीस ते पंचवीस नागरिकांनी महावितरण कार्यालयावर वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आले होते. यावेळी महावितरण कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हता केवळ ऑपरेटर असल्यामुळे नागरिकांनी संबंधित उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना दूरध्वनीवरून संपर्क केला. मात्र या अधिकाऱ्यांनी कार्यालय परिसरात येण्यास आणि वीज ग्राहकांची समस्या ऐकून घेण्यास टाळाटाळ केली. एवढेच नाही तर दूरध्वनीवरून तुम्ही आल्या पावले घरी जा,,, तुमच्याने काय होते ते करून घ्या... असे म्हणून, तात्काळ येथून गेले नाही तर पोलिसांना बोलून तुम्हाला जेलमध्ये टाकेल असे वक्तव्य केले. असंल्याचा आरोप येथील गोरसेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद राठोड यांनी केला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या सुलतानी कारभार कशा पद्धतीने चालतो याची प्रचिती या गावकऱ्यांना आली आहे.

दरम्यान पोलिस कर्मचारी या ठिकाणी पोहोचल्यानंतर संबंधित लाईनमन जागेवर आला आणि वीज पुरवठा सुरळीत करून देतो असे आश्वासन देत होता, मात्र गावकर्यांनी जोपर्यंत लाईट सुरु होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्र घेतला. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करून रात्रीला लाईनमनला वीजपुरवठा चालू करण्यास पाठविले. यामुळे वीज ग्राहक तात्पुरते माघारी परतले परंतु जोपर्यंत येथील वीज पुरवठ्याची समस्या पूर्णपणे निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. असे म्हणत महावितरणच्या विरोधात सर्व शेतकरी व गावकऱ्यांना घेऊन मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांचा सम्पर्क होऊ शकला नाही.


आम्ही नियमित बिल भरतो.. आम्हाला तुरुंगात टाकण्याची भाषा का - प्रमोद राठोड, गोरसेना तालुकाध्यक्ष
याबाबत गोरसेनाचे तालुकाध्यक्ष प्रमोद राठोड म्हणाले की, आमच्या ग्रामीण परिसरात सर्व गावांमध्ये वीज सुरू आहे. मग आमच्या गावात का नाही… तुम्ही आमच्या गावकऱ्यांना अंधारात ठेवत असाल… तर सर्व तालुक्यातील वीज बंद करा. आम्ही वीज बिल नियमित भरतो, तरीही अधिकारी आम्हाला तुरुंगात टाकण्याची भाषा बोलतात… आणि वीज चोरांसोबत अधिकारी संगनमत करतात… आम्ही पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली तर आमचा काय..? गुन्हा आहे.. आधी हे बघा आणि बिनदिक्कत तुरुंगात टाका, असंही ते म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी