नांदेड। नांदेडच्या प्रभाग क्र.६ मध्ये काबरानगर परिसरातील ओपन स्पेसवर पुजा नर्सरीने केलेले अतिक्रमण तात्काळ उठवून या भागातील नागरिकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी काबरानगर वासियांनी केली असून, महापालिकेच्या नोटीसीनंतर देखील सदरच्या जागेवरचे अतिक्रमण न हटविल्याने या भागातील नागरिक आक्रमक झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काबरानगर हे पूर्वी पावडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट होते. त्यानंतर या भागाचा महापालिकेत समावेश झाला. काबरानगरच्या तेंव्हाच्या लेआऊटमध्ये दोनशे प्लॉट असून, दोन वेगवेगळ्या ओपन स्पेस आहेत. अनेक वर्षापासून महानगरपालिकेने या ओपन स्पेसची नोंद घेतली नव्हती. याच भागात श्रीकृष्ण मंदिर विकसित होत असून, या मंदिराचा विकास श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे. या काबरानगर परिसरात जवळपास २ हजार ९३० मीटर म्हणजे ३१ हजार ५२७ चौरस फुट आकाराची ओपन स्पेस आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ओपन स्पेसमध्ये खासगी पुजा नर्सरी कार्यरत आहे. ओपन स्पेसच्या तीन चतुर्थांश भाग पुजा नर्सरी वापरत असल्याने या भागातील लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. वॉकींग ट्रॅक, ओपन जिम, लहान मुलांना खेळण्याची साधने इत्यादी उभारण्यासाठी ही जागा काबरानगरवासियांना उपलब्ध व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे.
श्रीकृष्ण मंदिराचा विकास वेगाने होत असून, खेळाचे मैदान व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी ओपन स्पेसवर अतिक्रमित झालेली पुजा नर्सरी त्वरित हटविण्या यावी, या मागणीसाठी ३० जुलै २०२२ रोजी समस्त काबरानगरवासियांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यानंतर काबरानगर वासियांच्या शिष्टमंडळाने या भागाचे नगरसेवक महेश कनकदंडे यांच्यासमक्ष तत्कालीन उपायुक्त खानसोळे यांच्या समवेत चर्चा करुन सर्व कागदपत्रे सादर केली. नगरसेवक राजू यन्नम, नगरसेवक प्रतिनिधी मिलिंद देशमुख यांनाही याबाबत अवगत करण्यात आले.
नागरिकांसोबत झालेल्या चर्चेनंतर २० सप्टेंबर रोजी पुजा नर्सरीचे मालक मयूर काबरा यांना मोकळ्या जागेवर केलेले अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढून घेण्याची नोटीस बजावण्यात आली. सदरचे अतिक्रमण आपण स्वतः काढून न घेतल्यास महानगरपालिकेकडून हे अतिक्रमण काढून घेण्यात येईल व त्यासाठी येणारा खर्च आपल्याकडून वसुल करण्यात येईल, अशी नोटीस मालमत्ता व्यवस्थापकाच्या मार्फत पुजा नर्सरीचे मालक मयूर काबरा यांना देण्यात आली होती.
आज तीन महिने उजाडले तरी या खुल्या जागेवरचे पुजा नर्सरीचे अतिक्रमण काढून न घेतल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. कॉलनीचे ओपन स्पेस हे नागरिकांसाठी खुले करावे या मागणीसाठी श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचा लढा सुरुच असून, जवळपास ६८ प्लॉट धारकांनी महापालिकेकडे प्रत्यक्ष शिष्टमंडळाव्दारे भेटून हे अतिक्रमण काढावे, अशी मागणी केल्यानंतर सुध्दा तसेच याबाबत नोटीस देवून सुध्दा हे अतिक्रमण न काढल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबतचा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा काबरानगर वासियांनी दिला आहे.