नांदेड। मानवी हक्क ही वैश्विक संकल्पना असून व्यक्ती - समाज व राष्ट्रोन्नतीसाठी मानवी मुल्यांवर आधारलेल्या समाजाची गरज लक्षात घेवून म.फुले-राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्कासाठीच आपले आयुष्य दिले, असे प्रतिपादन पिपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.अशोक सिद्धेवाड यांनी केले. ते कै.भगीरथ शुक्ला यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मानवी हक्क वास्तव आणि युवकांची भूमीका या विषयावर आयोजित एका व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए डॉ.प्रविण पाटील हे होते.
पुढे बोलतांना डॉ.सिद्धेवाड म्हणाले की, भारताला न्याय आणि समतेसाठी लढणार्या सुधारकांची प्रदिर्घ परंपरा असून अनेक मानवी हक्कांचा अंतर्भाव भारतीय संविधानात आहे. महिला, मुले आणि शोषितांसाठी अनेक कायदे करुन मानवी हक्क संरक्षणाची फळी मजबुत केली आहे. परंतु अद्यापही लोकशाही विरोधी व्यक्तींकडून त्याचे हनन होताना शिक्षित तरुणांनी त्याचे मुक साक्षीदार न होता त्याविरुध्द व्यक्त झाले पाहिजे तरच संविधानकर्त्यांना अपेक्षित समाज साकार होईल.
आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ.प्रविण पाटील यांनी लोकशाहीत मतभिन्नता राखूनही परमताचा आदर करता आला पाहिजे असे मत मांडले. यावेळी नां.ए.सो.चे सदस्य कॉ.ऍड. प्रदीप नागापूरकर, श्री. गणेश पाटील यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सायन्सचे उपप्राचार्य डॉ.एल.पी. शिंदे यांनी केले तर आभार उपप्राचार्या डॉ.अरुणा शुक्ला यांनी मानले. कार्यक्रमास सायन्सचे उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे, इंजि.अय्यर, श्री.बालाजी टिमकीकर, प्रा.डॉ.जनकवाडे, कॉ.घायाळे, सौ.सुषमा गहेरवार, सूर्यकांत वाणी, राजेंद्र शुक्ला, प्रकाश शुक्ला, श्याम शुक्ला, राम शुक्ला, महेश शुक्ला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.