‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’ या विषयावर विशेष संवाद !
मुंबई। श्री. बी.के.एस्.आर्. अय्यंगार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तिरुपती देवस्थान सरकारच्या नियंत्रणात आल्यावर पूर्वीपासून सरकारसाठीच काम करत आले आहे आणि आताही तेच करत आहे.
येथील ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असलेली तिरुपती देवस्थाना नजीक असलेली बांधकामे तोडण्यात आली. येथील धार्मिक परंपरा बंद करण्याचा प्रयत्न केला. सरकार नियंत्रित मंदिर समितीला हिंदूंच्या धार्मिक भावनांशी देणेघेणे नाही. हिंदूंनी आत्मविश्वास न गमावता आपल्या धर्मबांधवांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी. हिंदूंची मंदिरे ताब्यात घेण्याविषयी विविध न्यायालयांनी हिंदूंच्या बाजूने दिलेल्या निकालांचा हिंदूंनी अभ्यास करायला हवा. हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील, असे प्रतिपादन पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती-अधिकार कार्यकर्ते श्री. बी.के.एस्.आर्. अय्यंगार यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
तेलंगणा येथील ‘ख्रिश्चन स्टडीज'च्या अध्ययनकर्त्या इस्टर धनराज म्हणाल्या की, तिरुपती देवस्थानात ख्रिस्ती पंथीय व्यक्ती कारभार चालवून अपप्रकार करत आहेत. यांना हाकलून द्यायला हवे. नियोजनबद्धरित्या हिंदूंच्या देवस्थानात घुसखोरी करत हे हिंदूंची देवस्थाने पोखरत आहेत. हे सर्व थांबविण्यासाठी हिंदूंना सतर्क राहून यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करायला हवी. यासाठी कायदे खूप कडक होणे आवश्यक आहेत आणि संविधानातील काही कलमांमध्येही बदल होणे आवश्यक आहे. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित पुढाकाराने या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल होईल, असा मला विश्वास वाटतो, असेही इस्टर धनराज म्हणाल्या.
श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 99879 66666)