नांदेड। सीमावर्ती भागातील लोकांच्या भावना समजून घेत होट्टल ते संगम अशी संवाद यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती होटटलचे समन्वयक तात्यासाहेब देशमुख यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील जनतेच्या भावना दिवसागणिक उग्ररूप धारण करत आहेत. धर्माबाद बिलोली आणि देगलूर या तालुक्यातील जनतेने आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या कालावधीत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनाला गती देण्यासाठी संवाद यात्रा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी यापूर्वीच बिलोली येथे जाहीर केले होते. याबाबत येसगी येथे समन्वयक तात्यासाहेब देशमुख, गंगाधर प्रचंड, वेंकट पांडवे यांनी निर्णय घेतला असल्याचे समन्वयकांकडून सांगण्यात आले.
संगम येथील संदेश यात्रेत धर्माबाद तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ आणि नागरिक सहभागी होणार असल्याचे धर्माबाद येथील समन्वयकांनी स्पष्ट केले. धर्माबाद तालुक्यासह देगलूर तालुक्यातील होट्टल ते बिलोली तालुक्यातील संगम ही यात्रा याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध विचाराच्या व्यक्तींचे लक्ष लागून आहे. तात्यासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने देगलूर तालुक्यातून ही संवाद यात्रा निघणार असल्याचे माहिती समन्वयकांनी दिली आहे.