नांदेड। पत्नीने चार मित्रांच्या मदतीने कर सल्लागार असलेल्या आपल्या पतीचे अपहरण करून, मारहाण केल्याची खळबळजनक घटना दि.1 डिसेंबर रोजी घडली होती. त्या प्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी संबंधित महिलेसह तिच्या चार मित्रांना अटक करून आज न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश महोदयांनी या पाच जणांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सोमठाणा येथील कर सल्लागार प्रकाश तुकाराम श्रीरामे यांचा विवाह गितांजली बळवंतराव हाके रा.हाटकरवाडी ता.चाकूर हिच्यासोबत झाला असून, त्यांना 15 वर्षाचा एक मुलगा व 10 वर्षाची एक मुलगी आहे. दरम्यान एका महिन्यापूर्वी गितांजलीसोबत प्रकाश श्रीरामे यांचा वाद झाला. तेंव्हापासून ते सोमठाणा ता. भोकर येथे राहण्यास गेले होते.
दरम्यान, दि.1 डिसेंबर रोजी प्रकाश श्रीरामे हे नांदेडला आले असता येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यांची गितांजलीशी दुपारी भेट झाली. रस्त्यावर तिने वाद घालत आपली मुले कुठे आहेत? मला ते परत दे असा जाब विचारला. त्यानंतर दोघे शहरातील मयुर विहार कॉलनीतील घरी गेले. यावेळी तेथे पत्नी गितांजलीसोबत तिचे मित्र बालाजी शिवाजी जाधव,रा. दयासागर नगर तरोडा खुर्द, दिलीपसिंग हरीसिंग पवार, रा. एमजीएम कॉलेज समोर नांदेड, अवतारसिंघ नानकसिंघ रामगडीया, रा. बाबानगर नांदेड व अमोल गोविंद बुक्तरे, रा. नवी वाडी, पुर्णा रोड,नांदेड हे सर्व होते.
या सर्वांनी कर सल्लागार प्रकाश तुकाराम श्रीरामे यांना कार क्रमांक एम.एच.26 बी.क्यु. 0016 मध्ये जबरदस्तीने डांबले व सौरभ बार मालेगाव रोड येथे नेऊन मारहाण केली. त्यानंतर औंढा रस्त्यावर त्यांना सोडून दिले. श्रीरामे यांच्या या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी विविध कलम आणि 34 भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनील भिसे आणि पोलीस अंमलदार ओमप्रकाश कवडे यांनी प्रभावीपणे मोहिम राबवून पतीचे अपहरण करणाऱ्या पत्नीसह तिच्या चार मित्रांना अटक केले. या पाचही आरोपींना पोलिसांनी दि.2 डिसेंबर रोजी दुपारी तपासासाठी कोठडी मागणीसाठी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यां सर्वांना 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.