एम.टी. फड कंपनीला महावितरणचे अभय; २२ दिवसा नंतरही वीजचोरीची कारवाई गुलदस्त्यात - NNL

कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करण्याच्या मागणीकडे होतेय दुर्लक्ष  


हिमायतनगर|
हिमायतनगर शहरात गेल्या २२ दिवसापुर्वी सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजनेच्या कामावर होत असलेली अनाधिकृत विजचोरी सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी उघडकीस आणून दिली. यास जवळपास २२ दिवसाचा कालावधी संपुष्टात येत असून, अद्यापपर्यंत विज चोरी करणाऱ्या एम. टी फड कंपनीवर कारवाई झाली नसून, केवळ दंड वसूली करण्यात येणार आहे एवढेच महावितरणच्या कार्यालयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी संबंधीत वीजचोरला अभय देत असल्यामुळे कारवाई गुलदस्त्यात ठेवण्यात येत असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने पत्रकारांशी बोलताना केला आहे.

हिमायतनगर शहराच्या कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी गेल्या ०४ वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जवळपास १९ कोटी रूपये खर्चाची प्रभावी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. शासनाने सदरील कामासाठी निधी ही उपलब्ध करून दिला. सदरचे काम परभणी येथील एम. टी. फड कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. गेल्या ३ वर्षांपासून सदरचे काम अतिशय कासव गतीने चालू आहे. विजेच्या सहाय्याने काही कामे करावयाची असल्यास महावितरणची परवानगी घेऊन काम करणे अपेक्षित असतांना ठेकेदाराने विज चोरीचा फंडा अवलंबला आहे. गेल्या तिन वर्षांपासून या ठिकाणी सातत्याने विज चोरी होत आहे. महावितरणच्या अभियंत्याची या विज चोरीत भागेदारी असल्यामुळे की, काय? कारवाई करणे दुरच होते.  

हा प्रकार हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिंदे यांना लक्षात येताच त्यांनी स्वतः विज चोरीच्या ठिकाणी उभे राहून महावितरणच्या अभियंत्याला जामोक्यावर बोलावले. आम्ही कारवाई करतो, म्हणून कनिष्ठ अभियंता पवन भडंगे यांनी आपलाला विश्वासात न घेताच परस्पर पंचनामा केला. आणि प्रकरण रफादफा करण्याचा बेत केला आखला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला असून, उपकार्यकारी अभियंता श्री लोणे यांना वीज चोरीकडे दुर्लक्षित करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करा अश्या कारवाईच्या अनुषंगाने रितसर पत्र व्यवहार केला. परंतू मॅनेजमेंट मध्ये पटाईत असलेल्या उपकार्यकारी अभियंत्यांनी जाणीव पूर्वक उपरोक्त कारवाईस टाळाटाळ चालवली आहे. आज घडीला विज चोरी पकडून जवळपास २२ दिवसाचा अवधी उलटून गेला आहे. परंतू ठोस कारवाई झाली नाही.  

त्यामुळे अभियंते व विज चोरामध्ये साटेलोटे चालले की काय..? असा संशय नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नियमानुसार कारवाई नाही झाल्यास अधिक्षक अभियंत्याची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे तक्रारदार दिलीप शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी