दिव्यांगांच्या विकासात मास्टर स्ट्रोक; महात्मा गांधी सेवा संघाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव -NNL

श्रवणयंत्र वितरणात गिनीज वर्ल्ड बुकात नोंद


नांदेड।
दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेता नांदेडसह राज्यभर तळमळीने कार्य करणाऱ्या विजय कान्हेकर यांच्या महात्मा गांधी सेवा संघाच्या कार्याची दखल घेत दहा तासात तब्बल ४ हजार ८०० श्रवण यंत्राचे पुण्यात वितरण करण्यात आले. याची नोंद जागतिक विक्रमात गिनीज वर्ल्ड बुक मध्ये झाली होती. दिव्यांगांच्या विकासात सातत्यपूर्ण कार्य करत मास्टरस्ट्रोक मारणाऱ्या महात्मा गांधी सेवा संघाचा नुकताच गौरव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार देवून करण्यात आला आहे.

महात्मा गांधी सेवा संघाच्या वतीने नांदेड सह परभणी, हिंगोली, बीड, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, पुणे, सिंदुदुर्ग व गोवा आदी जिल्ह्यात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष असतात. विविध प्रवर्गातील दिव्यांगांची गरज लक्षात घेता त्याना सहायभूत साधने या माध्यमातून पुरविण्यात येतात.

शहरी भागातील दिव्यांगांना याचा लाभ होत असला तरी जनजागृती अभावी गाव, वाडी व तांड्यातील लाभार्थी या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असते. यासाठी ही संस्था अशा दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांना आवश्यक असलेली साधने पुरविते. काही वर्षापूर्वी पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे दहा तासात तब्बल ४ हजार ८०० श्रवणबाधीतांना श्रवणयंत्र वितरीत करण्यात आले होते.

त्यावेळी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार, प्रसिद्ध क्रिकेटर रवी शास्त्री आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या संस्थेने आपल्या शाखांचा राज्य भर विस्तार करत दिव्यांगांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव सहायभूत साधनांचे वितरण केले. शेवटच्या दिव्यांगांपर्यंत पोचण्यासाठीच्या तळमळीची दखल घेण्यात आली असून दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ संस्था असा पुरस्कार देवून राष्ट्रपतींनी सन्मान केला आहे. हा सन्मान अन्य स्वयंसेवी संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी