मृदा चाचणीतून शेतीत होतोय सकारात्मक बदल - वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख -NNL

जागतिक मृदा दिन साजरा 


नांदेड|
शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा कार्यक्षम वापर करावा. मृदा चाचणीतून शेतीत  सकारात्मक बदल होत असल्याचे प्रतिपादन कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णीचे  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले. 

दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून जिल्हा अधिक्षक  कृषी  अधिकारी व जिल्हा मृद  सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी  व  कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णी यांचे संयुक्त  विद्यमाने आत्मा कार्यालय नांदेड येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव तेलंग गावचे  शेतकरी चंद्रकांत  क्षीरसागर  तर  मार्गदर्शक महणून कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णीचे  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख,  डॉ. माणिक कल्याणकर, डॉ. संदीप  जायेभाये, डॉ. महेश अंभोरे, डॉ. गिरीश देशमुख  यांची उपस्थिती होती. 


मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करून सर्वांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खताच्या मात्रा द्याव्यात, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. कृषि  पर्यवेक्षक मनोज दिकतवार यांनी  शेतकऱ्यांना मृदा दिनाचे महत्व सांगून मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. माणिक कल्याणकर यांनी शेतीतील मृदा नमुना कसा घ्यावा. प्रयोग शाळेमध्ये कसा पाठवावा या बाबतची माहिती सांगितली. तसेच जमिनीमध्ये  जैविक  सूक्ष्म जीवाचा  अधिवास  वाढणे  ही काळजी  गरज  असून  जैविक  संघ, ट्रायकोडार्मा आदी जैविक  संघाचा  वापर  करावा असेही सांगितले. डॉ. संदीप  जायेभाये  यांनी जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन, मिश्र पीक पद्धती, आंतर पीक पद्धती  विषयी माहिती दिली. 

डॉ. महेश अंभोरे यांनी जनावरातील  लंपी  स्किन  या विषाणूजन्य आजाराविषयी  माहिती दिली. तंत्र अधिकारी के.ए.म जाधव  यांनी शेतकऱ्यांना जमीनीला  जिवंत ठेवण्यासाठी  सेंद्रिय शेतीतील बिजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, इत्यादी घटकांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. समाजाची  शेती व जमिनीपासून नाळ तुटू नये, तसेच शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या मातीची तपासणी करावी असेही आवाहन त्यांनी केले.  सेंद्रिय खत वापराचे फायदे, तणनाशकाचा कमी वापर, मातीचे सशक्तीकरण, नैसर्गिक शेती, झीरो बजेट शेती, गांडूळ खत निर्मिती, कृषिक अँप बद्दल माहिती यावेळी देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मौजे बोरगाव तेलंग गावातील उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकीचे वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी सहायक  वसंत जारीकोटे  यांनी तर जिल्हा मृद सर्वेक्षण  व मृद  चाचणी  अधिकारी  प्रकाश पल्लेवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक शिवाजी शिंदे, कृषी सहायक  दत्तात्रय चिंतावार, गजानन पडलवार, जावेद शेख, मोहन बेरजे, कराळे, श्रीमती सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी