‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा आज जिल्ह्यात आरंभ
नांदेड| केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलजीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नागरिकांना नियमित मिळावे या उद्देशाने 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ हे अभियान आजपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते जिल्हा परिषद नांदेड येथे आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची उपस्थिती होती.
अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व एकुण 11,290 पाणी स्त्रोताचे पाणी प्रयोगशाळेत तपासले जाऊन सर्व नागरीकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘हर घर नल से स्वच्छ जल’ हे अभियान जिल्ह्यात राबवून सर्व नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळाले पाहिजे याकरिता पाणी स्त्रोताच्या पूर्ण तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. पाणी स्त्रोताच्या जैविक व रासायनिक ह्या चाचण्या सातत्याने नियमित होणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याकरिता विहिरी, बोरवेलच्या पाणी स्त्रोताची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे.
विहिरीतील कचरा साफ करावा, त्याची नियमित स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. तसेच पाणी स्त्रोताचा परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवावा, गाव परिसर, पाणी स्त्रोत स्वच्छ ठेवण्याची सवय झाली पाहिजे, स्वच्छतेसाठी सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. पाणी व स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छाग्रही, जल सुरक्षक यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पाणी स्त्रोताकडे काळजी घेऊन अस्थेने बघण्याची गरज आहे. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे, गावाची यंत्रणा सक्षम असेल तर सुरक्षित स्वच्छ पाणीपुरवठा नागरिकांना होईल. हेच आपले ध्येय असले पाहिजे. असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यावेळी म्हणाले.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करण्यासाठी शासन स्तरावर एक चांगले नेटवर्क तयार झाले असून त्यामध्ये पाणीपुरवठा विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, बीआरसी व सीआरसी, स्वच्छाग्रही, जलसुरक्षक यांचे जाळे निर्माण झाले आहे. ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ या अभियानाबरोबरच सांडपाणी घनकचरा याबरोबरच हागणदारी मुक्त कार्यक्रम ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यात यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी केले आहे.
‘स्वच्छ जल से सुरक्षा’ हे अभियान शुभारंभ प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, सामान्य व पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन-जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ आणि सर्व विभाग प्रमुख जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे दिलीप पवार, विशाल कदम, चैतन्य तांदुळवाडीकर, महेंद्र वाठोरे, सुशिल मानवरकर, डॉ नंदलाल लोकडे आदींची यावेळी उपस्थिती होती.