दर्जेदार पुस्तकांची निर्मिती होत असताना वाचकवर्गही वाढला पाहिजे - दत्ता डांगे - NNL

ज्येष्ठ लेखक प्रभाकर सुर्वे यांच्या ‘नियतीचा खेळ’ कथासंग्रहाचे थाटात प्रकाशन


नांदेड|
नांदेडची साहित्यचळवळ आता गतिमान होत आहे, त्याचबरोबर समृद्ध होत आहे. लेखकांकडून कसदार लेखन होत आहे तर प्रकाशकांकडून दर्जेदार पुस्तकांची निर्मिती होत आहे. मुखपृष्ठकार व आतील सजावट करणारे चित्रकार आणि अक्षरमांडणीकारही नांदेडचेच आहेत. अशा प्रकारे साहित्य व प्रकाशनक्षेत्र समृद्ध होत असताना येथील सुजाण वाचकवर्गही पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढला पाहिजे, असे उद्गार लेखक व प्रकाशक दत्ता डांगे यांनी काढले.

श्रीकर प्रकाशनाने सिद्ध केलेल्या व ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर सुर्वे यांच्या ‘नियतीचा खेळ’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रा.भगवान अंजनीकर, प्रा. संदिपान मोरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रा. संदिपान मोरे यांच्या हस्ते 'नियतीचा खेळ' कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रकाशक गिरीश कहाळेकर यांनी प्रास्ताविक केले तर लेखक प्रभाकर सुर्वे यांनी कथासंग्रह लिखाणामागची भूमिका सांगितली.     

दत्ता डांगे पुढे म्हणाले, लेखकावर जसे संस्कार झाले असतील व त्याचा जसा स्वभाव असतो त्यानुसार तो लेखन करीत असतो. त्याच्या लेखनातून त्याच्या स्वभावगुणांचे प्रतिबिंब पडत असते. लेखक प्रभाकर सुर्वे हे संत स्वभावाचे आहेत. लोकांनी एकमेकांशी सहकार्याने वागावे, आनंदाने राहावे, कोणी कोणावर बळजबरी करू नये, कोणाला फसवू नये असे त्यांना वाटते. परंतु या गोष्टींच्या विपरीत घडते तेव्हा त्यांच्या लेखणीतून कथा निर्माण होते. यातूनही त्यांचे लेखन प्रेरणादायीच असते असेही डांगे यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. संदिपान मोरे यांनी लेखक प्रभाकर सुर्वे यांच्या कथांवर भाष्य केले. प्रा.मोरे म्हणाले, सुर्वे हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असल्यामुळे सेवाकाळापासून नैतिक मूल्यांना त्यांनी अधिष्ठान दिले आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून डोकावते. ‘नियतीचा खेळ’ या पुस्तकातील प्रत्येक कथा वाचनीय व रंजक झाल्याने लेखकाचे म्हणणे सहजपणे वाचकांपर्यंत पोहचते.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा. भगवान अंजनीकर यांनी लेखक सुर्वे यांच्या सोबतच्या सेवाकालीन आठवणींना उजाळा दिला. लेखक सुर्वे यांची निरीक्षणशैली उत्तम असल्याने जसे अनुभवले तसे त्यांनी कथेतील प्रसंग मांडले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे चांगले विचार पेरण्याचा त्यांचा प्रयत्न वाचकाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आहे. तसेच पुस्तकाची निर्मिती उत्कृष्ट झाल्याबद्दल त्यांनी प्रकाशकाचे कौतुक केले. आगामी काळातही अशाच पुस्तकाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कवी कपिल सावळेश्वरकर यांनी केले. ‘शब्दशिल्प’ सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रामीण कवी शंकर वाडेवाले, आनंद पुपलवाड, सौ. प्रभाताई अंजनीकर, सौ. स्वप्नाली कहाळेकर, पत्रकार सदाशिव गच्चे, विजयकुमार चित्तरवाड, प्रा. सोपानराव लामकाणीकर, प्रा. किरण मोरे, विजय रेणगुंटवार, श्रीमती मीना घोडके,  सौ. लता देगावे, भारत जाधव, डॉ. बालाजी मनूरकर, रमेश बोरकर, शिवदास चंदापुरे यांच्यासह लेखक सुर्वे यांचा मित्र परिवार उपस्थित होता.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी