नांदेड। सतत पस्तीस वर्षापासून राजकारणात राहून देखील निरपेक्षवृत्तीने समाजासाठी अहोरात्र झटणारे भाजप नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर यांना श्री संत भानुदास महाराज संस्थान येहळेगाव जिल्हा हिंगोली तर्फे शेकडो शिष्यांच्या उपस्थितीत संतांच्या हस्ते " राजरत्न " हे पदवी देऊन गौरव करण्यात आला.
यावर्षीपासून श्री संत भानुदास महाराज संस्थान तर्फे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या पुरस्कारासाठी दिलीप ठाकूर यांची निवड करण्यात आली. येहळेगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीला हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील गुरुवर्य भानुदास महाराजांच्या हजारो शिष्यांची उपस्थिती होती.
काल्याच्या किर्तनानंतर हभप पांडुरंग महाराज,दिलीप ठाकूर व बापूजी महाराज यांच्या हस्ते काल्याची दही हंडी फोडण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थानचे उपाध्यक्ष गजानन गावंडे सर यांनी संस्थानच्या कार्याची माहिती देऊन दिलीप ठाकूर हे करत असलेल्या ७७ उपक्रमापैकी काही उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.संस्थानचे अध्यक्ष प्राचार्य सु.ग.चव्हाण यांनी दिलीप ठाकूर हे आपले विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन केले. त्यानंतर पांडुरंग महाराज, प्राचार्य सु.ग.चव्हाण, भाजप नेते बाळासाहेब पांडे, गावंडे सर, महंत कैलास महाराज वैष्णव, संस्थानचे सचिव मोतीराम मुटकुळे यांच्या हस्ते राजरत्न ही पदवी देऊन दिलीप ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, हा पुरस्कार मिळाल्यामुळे आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करीत असल्याची पावती मिळाली आहे.यापुढे आणखी जास्त निष्ठेने समाज कार्य करून पुरस्काराचा सन्मान राखू अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश नांगरे, संजयकुमार गायकवाड, काशिनाथ मोरे सोनखेडकर यांच्यासह अनेक उपस्थितांनी दिलीप ठाकूर यांची अभिनंदन केले. राजरत्न पदवी मिळाल्यामुळे ठाकूर यांच्या पुरस्काराच्या संख्येने सत्तरी गाठल्याने त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.