अर्धापूर| नांदेड़हुन संकष्ट चतुर्थी निमित्त जागृत देवस्थान सत्य गणपतीला दुचाकीवरून दर्शनासाठी जात असतांना दाभड शिवारात रिलायंस पेट्रोल पंपासमोर एका अज्ञात वाहनाने २५ वर्षीय दुचाकीस्वारास चिरडले,या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, यामुळे या रस्त्यावर आणखी एका बळीची वाढ झाली असून,आणखी किती प्राण गमवावे लागणार ? या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दर संकष्ट चतुर्थीला शेकडो भाविक अनवाणी पायाने दाभड येथील जागृत देवस्थान सत्य गणपती च्या दर्शनासाठी येतात,मंदिराला पैसे,सोने, चांदी अशी मोठी देणगी येते,येथे भावीकांच्या दुचाकी,तिनचाकी व चारचाकी वाहनांना पार्कींगसाठी जागा उपलब्ध होत नाही, त्यामुळे भाविकासह प्रवाशांना,चालकांना व पोलीसांना दर संकष्ट चतुर्थीला त्रास सहन करावा लागत आहे, राज्य क्र.३६१ रस्त्त्याचे काम सुरु आहे,अनेकजागी रस्ते जोडलेले नाहीत, त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
रविवारी ११ डिसेंबर ला सकाळी ९ वा.नांदेड येथील अक्षय जैन वय (२५) रा. कैलास नगर नांदेड हे संकष्ट चतुर्थी निमित्त सत्यगणपती देवस्थानच्या दर्शनासाठी दुचाकी क्र.एम एच २६ सी डी १४६८ हिच्यावरुन जात असतांना भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने दाभड शिवारातील रिलायंन्स पेट्रोल पंपासमोर पाठीमागून जोरात धडक दिली असता अक्षय जैन च्या डोक्याला जबर मार लागून डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, यावेळी अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव,सपोनि कपील आगलावे व महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, यावेळी रस्त्यावर वाहनासह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती,या अपघातामुळे नांदेड व अर्धापूर येथील गणेश भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे,या रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी वेळीच सबंधीतांनी पाऊले उचलावी अशी मागणी जनतेतून समोर येत आहे.याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी सपोनि कपील आगलावे हे अधिक तपास करीत आहेत.