नांदेड| श्रीश्रीश्री 1008 भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी केदार जगद्गुरु यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री केदारेश्वर सत्संग भवनाचे उद्घाटन श्री केदार जगद्गुरु यांच्या पवित्र सानिध्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते दि. 16 डिसेंबर रोजी होणार आहे. दि. 15 व 16 डिसेंबर असे सलग दोन दिवस चालणाऱ्या या उद्घाटन व धार्मिक सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड येथील आनंदनगर सोसायटीमध्ये हे सत्संग भवन साकारण्यात आले आहे. या भवनामध्ये शिक्षणाबरोबरच धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्य अखंडीतपणे चालणार आहे. ही वास्तू 16 रोजी लोकार्पित करण्यात येणार आहे. दि.15 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता पंचाचार्य ध्वजारोहण होणार असून त्यानंतर सकाळी 9 वाजता श्री मुल केदारेश्वर जगद्गुरु एकोरामाराध्य यांची मुर्ती प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत सोलापूर येथील शिवयोगीशास्त्री यांच्या वैदिकत्वाखाली होम, हवन करण्यात येणार आहे.
दि.16 रोजी सकाळी 11.05 वाजता श्री केदारेश्वर सत्संग भवनाचे लोकार्पण श्री केदार जगद्गुरु यांच्या दिव्य सानिध्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर हे राहणार असून या वेळी प्रमुख अतिथी म्हणून कंधारचे माजी आ.ईश्वरराव भोसीकर हे राहतील. तर या कार्यक्रमास महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक मठाधिपती, नांदेड जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे.
धर्मसभेनंतर दुपारी दोन वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री केदार जगद्गुरु यांचा नांदेड शहरातील हा पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाची श्री केदारेश्वर सत्संग भवन उद्घाटन सेवा समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यास पाच हजारांपेक्षा अधिक भक्तगण उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.