पाच राज्यातील खेळाडूंची दिवस-रात्र प्रकाश झोतात सामने रंगणार
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे दि. १०ते १४ डिसेंबर दरम्यान पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा (पुरुष) होणार आहेत. या स्पर्धेसाठी देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा या पाच राज्यातील १०९ संघ सहभागी होणार आहेत. असे एकूण संघातील संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक मिळून १४०० च्या वर खेळाडू सहभाग नोंदवणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन रविवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:०० वा. होणार आहे. या प्रसंगी नांदेडचे खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा व्हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू मा. अंकुश पाटील हे राहणार आहेत. असे संयोजन समितीचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि स्वागताध्यक्ष तथा प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी कळविले आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धा विद्यापीठाच्या क्रीडा विभागामध्ये दिवस-रात्र प्रकाश झोतात खेळविण्यात येणार आहेत. संयोजन समितीचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. यामध्ये निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, क्रीडांगण व्यवस्था, पंच व्यवस्था, उद्घाटन व्यवस्था,बक्षीस वितरण व्यवस्था ई. अशा अनेक समित्यामार्फत नियोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे ३५पंच तथा अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या पंच आणि अधिकाऱ्यामार्फत सदर व्हॉलीबॉल स्पर्धेचे संचालन होणार आहे.
या स्पर्धेचा समारोप तथा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा बुधवार दि. १४ डिसेंबर रोजी दु. ३:०० वा. क्रीडा विभागामध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड उत्तरचे आमदार मा. बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती लाभणार आहे. या शिवाय छत्रपती पुरस्कार विजेते तथा राष्ट्रीय खेळाडू मा.दत्ताभाऊ मोरे यांचीही उपस्थिती लाभणार आहे. असे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी कळविले आहे.