नांदेड| शारीरिक कमतरतेवर मात करत कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, प्रशासकीय अशा चौफेर क्षेत्रात अनेकांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मात्र, या दिव्यांग वर्गाला सरकारी पातळीवर मिळणारा न्याय केवळ कागदावर आहे. दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सामुदायिक कल्याण निधीची तरतूद आहे. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर पाच टक्के निधी ठेवला जातो. आजच्या स्थितीत दिव्यांगांना न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. दिव्यांगांना त्यांच्या लाभाच्या योजना मिळायला हव्यात अशी अपेक्षा दिव्यांग शिक्षक संघटनेचे संतोष घटकार यांनी व्यक्त केली.
ते जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जवळा दे. येथील जि. प. शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., माजी सरपंच कैलास गोडबोले, दक्षिण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंकुश पा. शिखरे, संतोष शिखरे, प्रदिप गच्चे, हैदर शेख यांची उपस्थिती होती.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जवळा येथील दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दिव्यांग बांधव कैलास हिंगोले, सन्मान गच्चे, आबासाहेब शिखरे, संतोष घटकार, पुंडलिक पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना घटकार म्हणाले की, राज्यशासन व केन्द्रशासनाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनेचा एकत्रीकरण करुन सर्व योजनेचा लाभ दिव्यागांना द्या तसेच शासनाच्या सूचनेनुसार सामुहिक व वैयक्तीक लाभाच्या योजना दिव्यांगापर्यंत पोहचल्या पाहिजेत.
शासनाच्या विविध योजनाची सांगड घालून दिव्यांगाना रोजगार व उद्योग मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे दिव्यांगाच्या कल्याणसाठी पाच टक्के निधी उपलब्ध असतो. त्यानिधीचा उपयोग दिव्यांगाच्या कल्याणासाठी व्हावा. तसेच प्रत्येक दिव्यांग बांधवांनी युआयडीआय कार्ड मिळवावे असेही ते म्हणाले.