नांदेड। सीटू संलग्न वन मजूर कामगार - कर्मचारी संघटनेच्या वतीने युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वन मजुरांच्या विविध मागण्याचे निवेदन दि.२ डिसेंबर रोजी माहूर परीक्षेत्राचे वन परीक्षेत्र अधिकारी श्री रोहित जाधव यांना देण्यात आले.
वन कामगार - कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाच्या विविध मागण्या घेऊन दिनांक १७ते १९ ऑक्टोबर रोजी असे तीन दिवस उप संरक्षक कार्यालय नांदेड येथे उपोषण केले आहे. तेव्हा उप वन संरक्षक श्री केशव वाबळे यांनी वन कामगारांचे थकीत वेतन देण्याचे आणि त्यांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच माहूर वन परीक्षेत्र अधिकारी यांनी देखील संघटनेस लेखी आश्वासन यापूर्वी दिले आहे.
थकीत पगार देण्यात यावा. सर्व कामगारांना कामावर तात्काळ घेण्यात यावे. कार्यरत असलेल्या वन कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार कायम करण्याचा प्रस्ताव नव्याने शासनास सादर करा. तसेच वन रक्षक आणि वनपाल आदींना बैठकीत बोलावून सर्व कामगारांची पडताळणी करून त्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे.आदी मागण्या युनियन च्या वतीने करण्यात आल्या आहेत.
माहूर परीक्षेत्राचे वन परीक्षेत्र अधिकारी श्री रोहित जाधव यांनी पुढील आठवड्यात बैठक लावून पडताळणी करून थकीत वेतन अदा करण्याचे व सर्वांना लवकरच कामावर घेण्याचे आश्वासन दिले आहे आणि वन परीक्षेत्र कार्यालया बाहेर येऊन निवेदन स्वीकारले आहे.
या शिष्टमंडळात युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष कॉ. नीलकंठ जाधव (माऊली)सचिव कॉ.मधुकर राठोड,कोषाध्यक्ष कॉ.डिगांबर टेंबरे,कार्याध्यक्ष कॉ.माधव धुपे, उपाध्यक्ष कॉ. सजूबाई राठोड,शकुंतलाबाई कौठेकर,सह सचिव कॉ.शेख शकीला बी शेख युनूस,कॉ. जयराज गायकवाड,साईनाथ टेंबरे,सयद रहीम,कॉ.गजानन पिसलवार,रमेश वाघमारे आदींसह अनेक वन मजूर उपस्थित होते.