नांदेड। उस्मानिया विद्यापीठ आणि डॉ.रोनाल्ड रॉस परजीवी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते १४ डिसेंबर २०२२ रोजी हैद्राबाद येथे मेडिकल ऑर्थोपोडॉलॉजी या विषयाच्या १५ व्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्याचे राज्य कीटक शास्त्रज्ञ आमचे मित्र आदरणीय माननीय डॉ. महेंद्र जगताप साहेब यांनी डेंग्यू नियंत्रण आणि संशोधन संदर्भात केलेल्या कार्याचा गौरव या परिषदेत करण्यात आला. या कार्याबद्दल त्यांना " डॉ. कल्पना बारुआ अवॉर्ड फॉर एस्कलन्स " या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये डॉ. रीना टिळक, डॉ. रुपकुमारी, डॉ. बी. के. त्यागी, डॉ. पी. के. श्रीवास्तव, डॉ. कल्पना बरुआ, डॉ. वीर, डॉ. पी. के. दास, डॉ. सजल भट्टाचार्य, डॉ. जगबिर सिंग, डॉ.आर. एस. शर्मा आणि इतर देश परदेशातून शास्त्रज्ञ उपस्थित होते.
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ते राज्य कीटक शास्त्रज्ञ अशा विविध पदावर डॉ. महेंद्र जगताप मागील दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत आहेत. सातारा येथे जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून कार्यरत असताना डेंग्यू नियंत्रणासाठी त्यांनी अंमलात आणलेला साप्ताहिक डेंग्यू नियंत्रण कार्यक्रम विशेष उल्लेखनीय ठरला आहे. सांगली- कोल्हापूर भागातील महापूर, झिका, जे ई उद्रेक अशा अनेक उद्रेकांमध्ये त्यांनी महत्त्वाचे काम केलेले आहे. विविध उद्योगांच्या सामाजिक जबाबदारीतून ( सीएसआर) त्यांनी कीटकजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण मदत राज्याला मिळवून दिली आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या कीटकजन्य आजारा संदर्भातील विविध संशोधन प्रकल्पामध्ये ते सहभागी आहेत. वातावरणातील बदल आणि त्याचा कीटकजन्य आजारांवरील परिणाम या विषयामध्ये त्यांना विशेष रस आहे. कीटकशास्त्र विषयातील तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे ते सहलेखक आहेत. या महत्त्वपूर्ण व्यासपीठावर झालेल्या सन्मानाबद्दल डॉ महेंद्र जगताप साहेब यांचे महाराष्ट्रातून आरोग्य सेवे तर्फे सर्वत्र कौतुक होत आहे.