नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने ‘विर बाल’ दिवसाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा निकाल श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या जन्मोत्सव दिनी म्हणजे दि. २९ डिसेंबर रोजी पुरस्कार देऊन जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांनी दिली आहे.
चार साहिबज़ादे बाबा अजीतसिंघजी, बाबा जुझारसिंघजी, बाबा ज़ोरावरसिंघजी व बाबा फतेहसिंघजी यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे या उद्देशाने दि. २५ व २६ डिसेंबर रोजी ‘विर बाल’ दिवस म्हणून साजरा करण्याचे शासनाने जाहीर केले आहे.
धैर्य, साहस, सहनशिलता, पराक्रम व देशभक्ती यांचा संगम असलेले अत्यंत थरारक असे हे बलिदान स्मरणात राहावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ‘चार साहेबजादों का बलिदान-- एक अद्वितीय मिसाल’ या विषयावर ८०० ते १००० शब्द मर्यादे पर्यंत निबंध पाठवायचा आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास ५,०००/- रुपये द्वितीय स्पर्धकास ३,०००/- रुपये तर तृतीय स्पर्धकास २,०००/- रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असून स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दि. २९ डिसेंबर रोजी श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या जन्मोत्सव दिनी पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयीन तरुणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. दिपक शिंदे यांनी केले आहे. या स्पर्धेतील निबंध डॉ. दिपक शिंदे, संचालक, श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड या पत्त्यावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या पत्रासह दि. २२ डिसेंबर पर्यंत पाठवावेत असे आवाहन डॉ. दिपक शिंदे यांनी केले आहे.