नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप आज अत्यंत रोमांचक सामन्याने झाला. यामध्ये मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या सामन्यात सर्वाधिक विजय संपादित करून भारती विद्यापीठ, पुणे यांनी अंतिम विजेतेपद पटकावले आहे.
यापूर्वी झालेल्या साखळी सामन्यात भारती विद्यापीठाने सलग चारपैकी तीन सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले. आपल्या वैवध्यपूर्ण खेळाने पुण्याच्या संघाने प्रक्षेकांची मने जिंकली. आपल्या चौथ्या साखळी सामन्यात खुशालदेर हनमानगडी, विद्यापीठास नमवून स्पर्धेत आपले वर्चेस्व कायम ठेवले. या स्पर्धेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि युनिवर्सिटी ऑफ राज्यस्थान जयपूर यांच्यामध्ये लढत होणार आहे. चौथ्या स्थानावर खुशालदेर हनमानगडी यांना समाधान मानावे लागले.
जानेवारी महिन्यात मंगळूर विद्यापीठ येथे होणाऱ्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या स्पर्धेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, खुशालदेर हनमानगडी, भारती विद्यापीठ पुणे, युनिवर्सिटी ऑफ राज्यस्थान जयपूर हे संघ पात्र ठरले आहेत. सदर स्पर्धा ४ ते ८ जानेवारी-२०२३ दरम्यान होणार आहेत. विद्यापीठात सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंच डॉ. सुमित चव्हाण, शिवा मुखेडकर, कासीम खान, नारायण उकलंचवार, विक्रम पाटील, अनिल गिराम आदींनी परिश्रम घेतले.