नांदेड। दिनांक 11 डिसेंबर रोजी धर्माबाद येथील शासकीय विश्राम गृहात सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनची वार्षिक बैठक फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार यांच्या अध्येक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीला तालुक्यातील आशा वर्कर ताई व गटप्रवर्तक ताई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्या महापुरुषांनी देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले त्या महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या सत्तेत बसलेल्या भाजपच्या लोकांचा या बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महागाई,शिक्षण,बेरोजगारी,आरोग्य, महिला अत्याचार- हिंसाचार या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.आशा व गटप्रवर्तकांविषयी सरकारची भूमिका,संघटनेचे लढे,संघटनेची ताकद एकजूट याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागामध्ये आशा व गटप्रवर्तक आरोग्य क्षेत्रात खूप मोलाचे काम करत असून अत्यंत तुटपूजा मानधनांवर काम करत आहेत. त्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे.कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे. इतर सर्व सुविधा सह पेन्शन मिळाले पाहिजे यासाठी हिवाळी अधिवेशनावर राज्यव्यापी मोर्चा होणार असून त्यामध्ये मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन कॉ. पडलवार यांनी केले.त्यानंतर पुढे काम करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली यामध्ये हंगामी तालुका अध्यक्ष पदी सुरेखा येडपलवार ताई सेक्रेटरी पदी सीमा खानापूरकर उपाध्यक्षपदी सुनीता भंडारवार यांची एक मताने निवड करण्यात आली. लवकरच रीतसर अधिवेशन घेऊन तालुका कमीटीची निवड करण्यात येणार आहे.