नांदेड| कॉंंग्रेेसचे युवा नेते राहुल गांधी हे सध्या देशभर पदयात्रा काढीत आहेत. यामुळे पक्षाला बळकटी येईल असा त्यांचा समज असावा परंतु प्रत्यक्षात विकासाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी नांदेडच्या सांगवी प्रभागातून पदयात्रा काढून दाखवावी असे आवाहन नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातून राहुल गांधी ज्या मार्गाने पदयात्रा काढणार आहेत त्या रस्त्यांची सध्या दुरुस्ती व डागडूजी युद्धपातळीवर केली जात आहे. नांदेडच्या विमानतळ मार्गाने राहुल गांधी यांचे हिंगोली जिल्ह्यात प्रस्थान होणार आहे. या विमानतळ मार्गाला लागूनच असलेल्या सांगवी प्रभागात मात्र विकासाच्या नावाने नुस्ती बोंबाबोंब चालू आहे. महानगर पालिकेत अनेक वर्ष सत्ता भोगूनही काँग्रेसने सांगवी प्रभागाचा विकास केला नाही. या प्रभागातील रस्त्यांची अवस्था तर फारच दयनीय झाली आहे.
राहुल गांधी यांनी सध्या देशभर "भारत जोडो पदयात्रा" सुरु केली आहे. दररोज ते पंचवीस ते तीस किलोमीटर पायी चालत आहेत आणि त्यांच्या पक्षाचे नगरसेवक मात्र त्यांच्या प्रभागातून अर्धा किलोमीटर देखिल साधा फेरफटका देखिल मारत नाहीत. आपल्या प्रभागाकडे वर्षानुवर्ष साधे ढुंकूनही पाहत नाहित. ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. यामुळे प्रभागातील रस्त्यांची वाट लागली आहे. याची काँग्रेस जणांना साधी लाज देखिल वाटत नाही.
राहुल गांधी यांनी सांगवी प्रभागातील गंगानगर, त्रीरत्ननगर, कुक्कुटपालन, बुद्ध विहार ते स्मशानभूमी या परिसरात पदयात्रा काढावी म्हणजे रस्त्यांची बकाल अवस्था त्यांच्या लक्षात येईल. यानिमित्त तरी सांगवी प्रभागातील रस्ते दुरुस्त होतील आणि चालू नगर सेवकांचे डोळे उघडतील, असे बोलल्या जात आहे.