नांदेड| वीज वितरण कंपनीतील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सभासदांवर नांदेड परिमंडळ कार्यालयाकडून केल्या जाणार्या अन्यायकारक कारवाया आणि मानसीक त्रास तसेच बदल्यांची काही प्रकरणे हे प्रश्न येत्या दि.15 नोव्हेंबर पर्यंत सोडवावेत, अन्यथा दि.16 नोव्हेंबरपासून नांदेड परिमंडळात म्हणजे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये असहकार आंदोलन करण्यात येईल.
माविकसंचे झोन अध्यक्ष एस.एम.घुले व सचिव प्रमोद बुक्कावार यांनी एका सविस्तर निवेदनात वीज कंपनीचे नांदेडचे मुख्य अभियंता यांना हा इशारा दिला आहे. मासिकसंचे सभासद असलेले कर्मचारी, अभियंते, जनमित्र हे कंपनीची थकबाकी वसूली आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम व्यवस्थीत करीत आहेत. असे असतांनाही नांदेड परिमंडळ कार्यालयाकडून त्यांच्यावर अन्यायकारक कारवाया केल्या जात आहेत. अशी तक्रार घुले व बुक्कावार यांनी केली आहे. कनिष्ठ अभियंता आशिष मेश्राम यांना चुकीच्या पध्दतीने निलंबित करुन नांदेड शहर विभागातून भोकर विभागाने सारखणी सारख्या नक्षलवादी भागात पदस्थापना दिली आहे. तसेच सहाय्यक अभियंता सिद्धार्थ मेश्राम यांची वैद्यकीय रजा मान्य करण्याचे तोंडी आश्वासन पाळले नाही, असेही त्यांनी नमुद केले आहे.
नांदेड परिमंडळाचे कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, मुख्य अभियंता हे माविकसंच्या अभियंत्यांना व्हीसीमध्ये अपमानाची वागणूक देतात असा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. कोणतीही व्हीसी ही कार्यालयीन वेळेत घ्यावी, अशीही मागणी माविकसंने केली आहे. वरील मागण्यांसह एकूण 22 मागण्या माविकसंने केल्या आहेत. हे सगळे प्रश्न येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत सोडवावेत, अन्यथा दि.16 पासून नांदेड परिमंडळामध्ये असहकार व वीज बिल वसूली बंद असे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही एस.एम.घुले व प्रमोद बुक्कावार यांनी दिला आहे.