केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची उत्पादन व निर्यात क्षमता वाढवणार – रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे -NNL


औरंगाबाद|
केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची  उत्पादन व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री  तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी केसर आंबा व सिट्रस पार्क उभारणीच्या आढावा बैठकीत दिली. केसर आंबा क्लस्टर विकासासाठी कार्यालय, कोल्ड स्टोअरेज आणि नर्सरीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

औरंगाबादचा केसर आंबा आणि जालन्याची मोसंबी या फळाना भौगोलिक मानांकन (GIS) मिळाले असल्याने या फळपीकाचे उत्पादन क्षेत्र वाढण्याबरोबरच निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाबरोबराच संशोधन व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सिट्रस इस्टेट पार्क उभारण्यात येत असल्याचे मंत्री भूमरे यांनी सांगितले. या बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.विकास मीना, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक,अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बालासागर तौर, सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कारले,  आंबा उत्पादक शेतकरी नंदू काळे, श्री. कापसे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

मराठवाड्यात केसर आंबा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.  माळरान जमिनीवर रोहयो अंतर्गत खड्डे निर्मिती करुन आंब्याची लागवड केल्यास जिल्ह्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात फळपीक लागवड होवू शकते. यासाठी शासनाच्या मालकीच्या पडिक जमिनीवर लागवड करण्याची सूचना आमदार हरीभाऊ बागडे यांनी केली.

करमाड येथील पणन मंडळाच्या जागेतील कोल्ड स्टोअरेज आंब्यासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  या बरोबरच औरंगाबाद येथे ‘आंबा महोत्सव’ आयोजन करुन शेतकऱ्यांना या महोत्सवात जास्तीत जास्त  सहभागी करुन घेण्याचे नियोजन कृषि विभागाने करावे, असे सूचित केले. मराठवाडयातील केसर आंबा इतर शहराबरोबरच परदेशात निर्यातक्षम करण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील यामध्ये सहभागी होण्यास सांगितले.

सिट्रस इस्टेट पार्क उभारणी बाबत आढावा - पैठण तालुक्यात इसारवाडी येथे सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याबाबत जागेच्या प्रस्ताव शासनास सादर झाला असून कृषी विभागाची मान्यता देखील काही दिवसात येईल असे पालकमंत्री भूमरे यांनी सांगितले.  मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रोपवाटीका, अद्यावत तंत्रज्ञान, विपणन तंत्र याचे प्रशिक्षण देवून मोसंबी पासून अन्न पदार्थ तयार करण्याचे संशोधन या सिट्रस इस्टेट पार्क मध्ये  करण्यात येणार आहे. मराठवाड्यात मोसंबी उत्पादन वाढविण्याच्या हेतूने शासने सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याचे निर्णय घेतल्याचा भूमरे यांनी सांगितले.

मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नर्सरी, शेतकत्यांना प्रशिक्षणाची निवासी व्यवस्था, प्रयोगशाळा, तपासणी व निर्यातक्षम उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण व तंत्रज्ञानाची माहिती  या सिट्रस इस्टेट पार्कमध्ये उपलब्ध करुन देण्याच्या सुविधा  असल्याची माहिती बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सिट्रस इस्टेट पार्क उभारणी बाबतच्या प्रस्तावाच्या त्रुटीची पूर्तता करुन सिट्रट इस्टेट पार्क  सुरु करण्याचे  प्रक्रियेला गती देण्याची निर्देश पालकमंत्री भूमरे यांनी कृषी विभागाला दिले.

रमाई आवास योजनेचा आढावा-  जिल्हयात रमाई आवास योजनेअंतर्गत  बांधण्यात येत असलेल्या घरासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्नाबाबत  पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. चित्तेपिपंळगाव येथे मंजूर घरांच्या बांधकामास गती देण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित केले. जुनी घरे नियमित करण्याबाबत तसेच ना विकास क्षेत्रातील घराबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश भूमरे यांनी दिले. या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडूरंग वाबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील  यांच्यासह संबधित यंत्रणेचे अधिकारी रमाई आवास योजनेच्या आढावा बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी