पुणे। पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या कविता प्रेमावर, सहजीवनावर आधारित "प्रिय भाई, एक कविता हवी आहे..." या सांगीतिक नाट्य अभिवाचनाच्या रंगमंचीय आविष्काराला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यानंतर शिवाजी मंदिर(दादर ) येथे शनीवार,१२ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता हा प्रयोग सादर होणार आहे. कविता वाचन , काव्य गायन आणि चित्र या सर्वांच्या साथीने हा कार्यक्रम उमलत जातो. या कार्यक्रमाची निर्मिती पुण्यातल्या "जागर" नाट्य संस्थेनी केली आहे.
मराठी रंगभूमीवरची आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे ही "सुनीताबाईंच्या" भूमिकेत आहे . अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, अपर्णा केळकर आणि जयदीप वैद्य हे कलाकार तिला नाट्य अभिवाचन आणि काव्य गायनाची साथ करतात. दिग्दर्शन अमित वझे यांचे आहे, संहिता डॉ समीर कुलकर्णी यांची आहे. संगीत जयदीप वैद्य,निनाद सोलापूरकर, आणि अपर्णा केळकर यांचे आहे.
कवितेच्या शोधाचा प्रवास
कविता हा भाई(पु.ल. देशपांडे) आणि सुनीताबाई यांच्या जिव्हाळ्याचा विषय. कवी आणि कविता या दोहोंवरही त्यांचं नितांत प्रेम. कोणाला तरी एक कविता हवी आहे, हे कळल्यानंतर ती मिळवून देणं ही जणू आपलीच जबाबदारी आहे असं मानणारं हे जोडपं !!
त्यांच्या आयुष्यातल्या कलत्या संध्याकाळी एका कवितेच्या शोधानं सुरू झालेला हा प्रवास, अशा वळणावर पोहोचतो, जिथे "हा उमाळ्याचा झरा येतो कुठून?" असा प्रश्न सर्वांनाच पडतो. वैयक्तिक अनुभवावर आधारित असलेलं हे लिखाण कवितेच्या अवकाशातून सुरू होतं, आपल्या जगण्याचा, त्यामागच्या प्रेरणांचा, आणि त्यातून लाभलेल्या समृद्धीचा मागोवा घेतं.या सांगीतिक नाट्य अभिवाचनाचा प्रयोग शिवाजी मंदिर(दादर ) येथे शनीवार,१२ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता सादर होणार आहे.