हिमायतनगर शहरात आकोडा टाकून वीजचोरी होतांना महावितरण विभाग कुंभकर्णी झोपेत -NNL

मुख्य विज लाईन वरून चोरी केली जात असल्याचे उघड झाले असतानाही महावितरण कडून अद्यापही पंचनामा का...? केला जात नाही
19 कोटीच्या पाणीपुरवठा नळ योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून चोरीने वीजेचा होते वापर
शहरात अशाप्रकारे अकोडे टाकले जात असतील तर ग्रामीण भागातील परिस्थितीचा विचार न केलेलाच बरा

हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील कायमस्वरूपी पाणी पुरवठा योज़नेचे काम १९ कोटीच्या निधीतून मागील ३ वर्षांपासून सुरु आहे. या नळयोजनेच्या टाक्या उभारण्याचे काम संत गतीने होत असल्याने अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. तर शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असून, या कामात पाईपलाईन जोडणीसाठी महावितरण कंपनीला चुना लावत ठेकेदाराकडून थेट मुख्य वीज वाहिनीच्या तारावर आकोडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. हा प्रकार स्थानिक महावितरण अधिकाऱ्यास माहित असताना देखील कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वहित साधले जात असल्याने दिवसाढवळ्या वीजचोरून नळयोजनेचे काम करण्यापर्यंत ठवकेदाराची मजल गेली असल्याचे उघडपणे दिसते आहे. 


हा प्रकार हिमायतनगर येथील आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या ठेकदाराच्या वीज चोरीचा प्रकार उघड करून या घटनेची माहिती महावितरण अधिकाऱ्यास दिली. परंतु संबंधित महावितरण अधिकाऱ्यांनी वीजचोरी होत असलेल्या ठिकाणी उपस्थिती न लावता आपल्या दोन कर्मचाऱ्यांना पाठवून विजेच्या लाईनवर टाकलेला सर्व्हिस वायर आणि पाईप पॅचिंग करण्याची ती मशीन जप्त केली आहे. परंत्तू आद्यपही या चोरीच्या घटनेचा पंचनामा केला गेला नसल्याने  महावितरण अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


यावरून महावितरण अधिकाऱ्याच्या संगनमताने थेट शहरातील मुख्य वीज लाईनवर अकोडा टाकून विजेची चोरी करत नळयोजनेचे काम केल्या जात असल्याचा संशय आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शहरात अश्या प्रकारे विजेची चोरी केली जात असल्याने याचा अधिकचा भार सर्वसामान्य वीजग्राहकांवर पडतो आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वीज वापरापेक्षा अव्वाच्या सव्वा विजबिल येत असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.


या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता नागेश लोणे यांच्याशी सम्पर्क साधला असता ते म्हणाले कि, आमच्या कर्मचाऱ्याने मशीनसह साहित्य जप्त करून आणले आहे. याचा रितशीर पंचनामा होऊन गेल्या दोन वर्षपासून चोरून वीज वापरल्या प्रकरणी संबंधित ठेकदारावर सुरुवातील दंडात्मक कार्यवाही होईल त्यानंतर दंड न भरल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे ते म्हणाले.  


आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे म्हणाले की नळ योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून गेल्या तीन वर्षापासून वीज चोरी केली जात आहे हे सर्व महावितरण अधिकाऱ्याला माहित आहे मात्र आतापर्यंत त्यांनी वीज चोरी करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही का केली नाही हा प्रश्न आहे तर ठेकेदाराने वीज वापरा संदर्भात कोणतीही परवानगी घेतली नाही अधिकृत कनेक्शन घेतली नाही त्यामुळे या वीज चोरी प्रकरणी गुत्तेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या संदर्भात महावितरण कारवाई करत नसेल तर आमच्या पक्षाकडून मी स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे एखाद्या गरीबाचे किंवा शेतकऱ्याच्या शेतात असा प्रकार झाला असता तर महावितरण कंपनी तात्काळ शेतकऱ्याच्या मोटार पंपा सह साहित्य जप्त करून त्यांना दंड लावतात मग ठेकेदाराच्या बाबतीत दिरंगाई का केली जाते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करून महावितरण अधिकाऱ्याच्या स्वार्थी वृत्तीचा भांडाफोड केला आहे.

महावितरण कंपनी अधिकाऱ्यां दुटप्पीपणा 
एकीकडे देशाचा कणा असलेल्या शेतकरी राजाच्या वीज पंपाचे कनेक्शन केवळ बिल भरले नाहीत म्हणून तोडण्याची धमकी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून दिली जात आहे. तर दुसरीकडे वीज चोरी करणाऱ्या ठेकेदारांना गेल्या 3 वर्षांपासून थेट अकोडे टाकून वीज वापरासाठी जणू मुखसंम्मती दिली जाते आहे. त्यामुळे महावितरण कंपनीत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा दुटप्पीपणा समोर येत असून अशा वृत्तीमुळे हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना विजेच्या अधिक भाराचा फटका बसतो आहे. विजेचा वापर कमी असतांना महावितरणचे अभियंता आणि रीडिंग घेणारे ठेकेदार यांच्या मनमानी पद्धतीने ग्राहकांना देण्यात आलेले विज बिल भरण्याची वेळ आली आहे. हा प्रकार कधी थांबणार आणि अनेक वर्षापासून हिमायतनगर सारख्या ठिकाणी वीज चोरांना खतपाणी घालण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची उचल बांगडी कधी होणार..? असा प्रश्न आता वीज ग्राहकच विचारू लागले आहेत. 

कारण एकाच ठिकाणी काही अधिकारी तीन -तीन, चार- चार वर्ष नोकरी करत असल्यामुळे वीज चोरी करणाऱ्याला अभय मिळत असून, आज एका ठिकाणची वीज चोरी उघड झाली अशा प्रकारे हिमायतनगर तालुक्यात विविध ठिकाणी विकास कामे सुरू असून त्या ठिकाणी सुद्धा परवानगीने वीज वापरली जात आहे का..? असा प्रश्न पुढे येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, अधीक्षक अभियंता नांदेड यांनी हिमायतनगर तालुक्यातील महावितरण कार्यालयामधून होत असलेल्या मनमानी व दुर्लक्षित कारभाराची चौकशी करावी. आणि या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या अभियंत्यांस थेट बडतर्फ करून घरी पाठवावे. आणि हिमायतनगर येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयात रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंत्याच्या जागा भरून कर्तव्यदक्ष अधिकारी या ठिकाणी नेमावे. आणि शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या वीज चोरीच्या प्रकारास आळा घालून सर्वसामान्य ग्राहकांची होणारी कोंडी थांबवावी अशी मागणी सामाजिक संघटना, शेतकरी, व्यावसायिक आणि घरगुती वीज ग्राहकातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी