माविकसंचे असंख्य कार्यकर्ते नवी दिल्लीला रवाना
नांदेड| देशातील वीज कंपन्यांच्या खाजगीकरण करण्याचे पावले केंद्र सरकारने उचलली आहेत. खाजगीकरणाला कडाडून विरोधी करण्यासाठी ऑल इंडिया इंडिपेन्डेट विद्युत एम्पलाईज फेडरेशन संघटनेच्यावतीने नवी दिल्ली येथे जंतरमंतरवर दि.21 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.
केंद्र सरकारने वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारने तयार केलेले असंवैधानिक वीज संशोधन विधेयक 2022 मागे घ्यावे. राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारे स्ट्रँडर्ड बिडींग डाक्यूमेन्ट रद्द करावे. खाजगी वीज कंपनीमध्ये एस.सी.,एस.टी. व ओबीसींना आरक्षण लागू करावे या मागणीसाठी स्वतंत्र भारत युनियनचे अध्यक्ष जे.एस.पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत.
या धरणे आंदोलनात देशातील विविध भागातून वीज कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे झोन अध्यक्ष शंकर घुले व सचिव प्रमोद बुक्कावार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातून असंख्य वीज कर्मचारी नवी दिल्लीकडे रेल्वेने रवाना झाले आहेत.