नायगाव। तालुक्यातील इकळीमाळ येथील नवीन आंबेडकर वस्तीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना ग्रामपंचायत कुठल्याच नागरी सुविधा तर देत नाहीच पण सावे पाणीही उपलब्ध करुन देत नसल्याची तक्रार साहेबराव सुर्यवंशी यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांचेकडे केली आहे.
आय एस ओ नामांकित असलेली नायगाव तालुक्यातील इकळीमाळ ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबरोबरच विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरत असून. दलित वस्तीच्या कामातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन ग्रामस्थांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या समोर अमरण उपोषण करुन कारवाईची मागणी केली होती. आता पाणी पुरवठ्यावरुन वादाची ठिणगी पडत आहे. एवढ्या वादग्रस्त कारभार आणि भ्रष्टाचाराची गटारगंगा झालेल्या इकळीमाळ ग्रामपंचायतला आय एस ओ नामांकन कसे मिळाले हा आता संशोधनाचा तर विषय झालाच असून. तालुक्यातील नागरिक व पंचायत समितीचे अधिकारीही मिळालल्या नामांकनाबद्दल दबक्या आवाजात संशय व्यक्त करत आहेत.
येथील वादग्रस्त ग्रामसेविकेच्या कारभाराचे एकीकडे धिंडवडे निघत असताना दुसरीकडे गावातील नागरिकांना नागरी सुविधाही मिळत नसल्याची ओरड सुरु झाली आहे. नवीन आंबेडकर वस्तीत ३० ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कुठल्याच नागरी सुविधा मिळत नाहीत. सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गावातील प्रत्येक कुटूंबाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन देणे ग्रामपंचायतची जबाबदारी असतांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत असून. केवळ जातीय द्वेषातून नवीन आंबेडकर वस्तीत पाणी पुरवठा केला जात नसल्याने माहिला व अबालवृध्दांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची तक्रार साहेब व्यंकटराव सुर्यवंशी यांनी गटविकास नायगाव यांचेही(ता.२८) रोजी तक्रार केली आहे.