माकपचे जिल्हा कचेरी समोर उपोषण
तोडगा काढला नाही तर तहसीलदार यांना घेराव घालणार - कॉ.गंगाधर गायकवाड यांचा इशारा
नांदेड| अखिल भारतीय किसान सभा आणि चिमटा धरण विरोधी कृती समितीचे बेमुद्दत धरणे आंदोलन दिनांक २३ नोव्हेंबर पासून तहसील कार्यालय नांदेड समोर सुरु आहे. त्या आंदोनातील मागण्या तातडीने सोडवाव्यात ही मागणी घेऊन सीटू कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.२४ नोव्हेंबर रोजी तीव्र निदर्शने करून लक्ष वेधले होते.
परंतु माहूर तहसीलदार किशोर यादव हे शेतकऱ्यांप्रती उदासीन असून तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल (भा.प्र.से.) आणि अप्पर जिल्हाधिकारी के.आर.परदेशी यांनी दिलेल्या निकालाची (आदेशाची) पायमल्ली करीत आहेत.ही बाब गंभीर असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हस्तक्षेप करून माहूर येथे शेतकऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन चिघळू नये यासाठी उपाययोजना करावी. माहूर तालुक्यातील पीडित देवस्थानच्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अनुदान देण्यात यावे आणि कास्तकार व तांबेदारांच्या पेरे लावून सात ब ची कारवाई करावी.
दिनांक २३ जुलै २०१९ सहायक जिल्हाधिकारी किनवट अभिनव गोयल यांनी पारित केलेल्या आदेशाची अंमलबाजवणी करावी.शेतकरी विरोधी प्रस्तावित चिमटा धरण रद्द करावे. दिनांक २३ नोव्हेंबर पासून माहूर तहसील कार्यालया समोर सूरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळू नये यासाठी उपाययोजना कराव्यात.आदी मागण्यासाठी सीटू आणि माकपचे उपोषण सुरु असून उपोषणाची दखल घेतली नाही तर माहूर तहसीलदार यांना घेराव घालणार असा इशारा सिटूचे जनरल सेक्रेटरी तथा माकपचे सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिला आहे. उपोषणामध्ये कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ. करवंदा गायकवाड,कॉ.लता गायकवाड, कॉ. जयराज गायकवाड, कॉ.श्याम सरोदे,कॉ. नागेश सरोदे,कॉ. सोनाजी कांबळे, कॉ.मीना आरसे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अविनाश यांनी यांनी तहसीलदार माहूर आणि सहाय्य्क जिल्हाधिकारी किनवट यांना पत्र काढून आदेशीत केले असून देवस्थान जमीन शेतकऱ्यांच्या मागण्या बाबत तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि तसे कॉ.गंगाधर गायकवाड यांना कळवावे असे नमूद आहे. जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनामुळे आणि दिलेल्या पत्रामुळे माकपचे उपोषण थांबविण्यात आले असले तरी देवस्थान शेतकऱ्यांच्या मागण्या तहसीलदार माहूर यांनी सोडविल्या नाही तर त्यांना घेराव घालणार असा इशारा कॉ. गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिला आहे.