नांदेड| दसऱ्यामध्ये रावण दहन केल्याबद्दल जयकुमार रावल यांच्यावर दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करण्याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन दिले आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलेल्या शिष्टमंडळात भाजपा संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, मंडल अध्यक्ष आशिष नेरळकर व मारोतराव वाघ, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप पावडे, प्राचार्य शंकर राठोड यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या निवेदनात खालील बाबींचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे दि.५ ऑक्टोबर 2022 रोजीच्या दसरा सणा निमित्त रावण दहन प्रसंगाचे राजकीय भांडवल करून आ. जयकुमार रावल यांच्यासह नऊ जणांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरी हिंदू संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे व अनादी काळापासून सुरू असलेल्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु विरोधकांनी कट रचून ठराविक आदिवासी तरुणांना हाताशी धरून रावणाच्या प्रतिकृतीची मोडतोड करीत रावण आमचा आराध्य असल्याचे सांगितले . वास्तविक आराध्याची लाट्या काठ्याने अशा प्रकारे मोडतोड कोणी भक्त करीत नसतो. यावरून हे राजकीय षडयंत्र होते हे सिद्ध होते.
या घटनेनंतर आमदार रावल आपल्या हिंदू धर्माच्या प्रथा परंपरेनुसार सिमोलंघनासाठी आपल्या सहकार्यांसोबत सदर ठिकाणी आले. मोडतोड झालेल्या रावणाच्या प्रतिकृतीच्या अवशेषांचे दहन करून जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. त्यावेळेस आपल्या राजकीय विरोधकांना उद्देशून गरीब तरुणांच्या माथे भडकविणाऱ्यांचा व्हिलन म्हणून उल्लेख करीत निषेध नोंदविला.या घटनेची चित्रफीत देखील सोशल माध्यमांमध्ये फिरत आहे. त्यात स्पष्ट व्हिलन असा शब्द असताना देखील एका जाती विशेष शब्द असल्याचा बणाव करण्यात आला .त्या अनुषंगाने आमदार रावल यांच्यासह नऊ जणांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे खोटा गुन्हा रद्द करण्याबाबत मागणी निवेदनात करण्यात आली आहे.