हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने 500 मीटर धावणे अर्थात रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
रन फॉर युनिटी या कार्यक्रमामध्ये जवळपास 35 विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी ठीक 07:00 वाजता सर्व विद्यार्थी स्वंयसेवकांनी सामूहिक रित्या सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले व महाविद्यालयाच्या प्रांगणातून प्रत्यक्ष 500 मी. धावण्यास सुरुवात केली आणि सांगता मात्र शहरातील प्रसिद्ध असलेल्या परमेश्वर मंदिराच्या आवारात करण्यात आली.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सदरील धावण्याच्या कार्यक्रमामध्ये हिमायतनगर पंचायत समिती व पुलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना सदरील कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले.
या रन फॉर युनिटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन करण्यात आली. व शेवटी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी स्वंयसेवकांना अल्पोपहाराची मेजवानी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने देण्यात आली.