नांदेड| “बोले सो निहाल, सत् श्री अकाल’चा जयघोष करत शहरातील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक दसरा महल्ला (हल्लाबोल) कार्यक्रम हर्षोल्हासात संपन्न झाला. या मिरवणुकीत गुरुद्वारा साहिबचे पवित्र निशाण, गुरू महाराजांचे घोडे, हात्ती निहंग सिंघ दल, पंथ, कीर्तनी जथ्थे, भजनी मंडळींसह देश-विदेशातून आलेले हजारो शीख भाविक सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात नगर कीर्तनाने झाली असून, नगर कीर्तन दसरा हल्लाबोल मिरवणुकीस दुपारी ४ वाजता प्रारंभ झाली. गुरुद्वारा गेट नं १ सुखमणी कॉम्प्लेक्स, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, हल्ला बोल चौक येथे पोहोचून पारंपरिक हल्लाबोल झाला. त्यानंतर फॉरेस्ट ऑफिस मार्गे, गुरुद्वारा बाऊली साहिब येथे काही वेळ पूजाअर्चा, विश्राम करून हे नगर कीर्तन (महल्ला) पारंपरिक मार्गाने बाऊली साहिब ते हिंगोली गेट, खादीग्राम उद्योग, खालसा हायस्कूल, जुना मोंढा मार्गाने गुरुनानक मार्केट समोरून, गुरुद्वारा चौरस्ता ते गुरुद्वारा नगीना घाट साहिब येथे पोहोचला. रात्री उशिरा समारोप म्हणजे ११.३० वाजता गुरुद्वारा नगीना साहिब येथून धार्मिक रीतीने पूजापाठ अरदास करून गुरुद्वारा गेट नं. १ मार्गाने तख्त सचखंड साहिब येथे नगर कीर्तनाचा समारोप करण्यात आला.