भारत जोडो यात्रा; प्रदेश काँग्रेसचे २७ पदाधिकारी अशोकरावांच्या मदतीला - NNL


नांदेड|
नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश स्तरावरील २७ पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी नियुक्त केले आहेत. 

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत अशोकराव चव्हाण यांनी यात्रा व्यवस्थापनासाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांची नेमणून करून त्यांच्यावर जिल्हानिहाय जबाबदारी देण्याची सूचना मांडली होती. नांदेड जिल्ह्यासाठी देखील काही पदाधिकारी नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी एकूण २७ पदाधिकारी नांदेड जिल्ह्यासाठी नियुक्त केले आहेत. हे पदाधिकारी पुढील आठवड्यात नांदेडला दाखल होणार असून, नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत. त्यांच्याकडे व्यवस्थापनासंदर्भातील विविध जबाबदारी सोपवली जाईल.

प्रदेश काँग्रेसने नांदेडसाठी नेमलेल्या २७ पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर व प्रदेश चिटणीस अॅड. सुरेंद्र घोडजकर या स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, आ. कैलास गोरंट्याल, डॉ. उल्हास पाटील, तुकाराम रेंगे पाटील, अॅड. रामहरी रुपनवार, चारुलता टोकस, अॅड. गणेश पाटील, किशोर गजभिये, सुभाष कानडे, हरिभाऊ शेळके, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, डॉ. राजू वाघमारे, रमेश शेट्टी, सचिन सावंत, उमाकांत अग्निहोत्री, विनायकराव देशमुख, अभिजित सपकाळ, प्रदेश चिटणीस अलका राठोड, अनिस कुरेशी, कॅ. निलेश पेंढारी, प्रकाश मुथा, सोनाली मारने, अॅड. गौरी छाब्रिया व प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांचा समावेश आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी