वनविभागाने वृक्षतोडीवर कार्यवाही करत नसल्याने नागरिकांतुन संताप व्यक्त केला जातोय
मुखेड, रणजित जामखेडकर। तालुक्यात अवैध वृक्षतोड ही वनक्षेत्राच्या मुळावर उठली आहे . खासगी तसेच राखीव असलेल्या वनक्षेत्रात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात येते. काही स्थानिक नागरिक व काही वेळा वनविभागाची पडद्यामागची छुप्या भ्रष्टाचारी भुमिकेमुळे ही समस्या ओढवली आहे. अवैध वृक्षतोड व अवैध वृक्ष वाहतूकीची माहिती वनपरिक्षेत्र कर्मचारी, अधिकाऱ्यांना देऊनही कसल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याची खंत वनप्रेमींनी व्यक्त केली. मुक्रमाबाद शहरात दिवसा वृक्षतोड करणाऱ्यांवर वनविभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
तालुक्यात इंधन, फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड करुन परराज्यात पर जिल्ह्यात वाहतूक केली जाते. मुखेड तालुका डोंगराळ भाग असून तालुक्यातील मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, येवती, चांडोळा, एकलारा , हिब्बट, जांब बु. आदी भागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोडीचे प्रकार उघडकीस आले आहे. अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यावर वन परिक्षेत्र विभागाकडून थातुरमातूर कारवाईचा दिखावा करण्यात येते. पण प्रत्यक्षात मोठ्या वृक्षतोड माफियास छुट दिली जाते. वनविभागातील भ्रष्टाचारामुळे जंगलातील वृक्षसंपत्ती आज कमी होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होत आहे.
राखीव वनक्षेत्रात प्रामुख्याने अशा घटना कोणासही कानडोळा न लावता करण्यात येतात. यात संबंधित परिसरातील काही वनपालापासून बड्या अधिकाऱ्यांपर्यंत धागेदोरे असण्याचा अंदाज असतो. महत्वाचे म्हणजे तालुक्यात सागवान तस्करी ही मोठ्या प्रमाणात होते. वनविभागाच्या चौक्यावर होणारी तपासणी, देण्यात येणारा पास अशा बाबी महत्वाच्या असतात . याचा अडथळा दूर करण्यासाठीही बऱ्याच वेळा लाकुडपती व्यावसायिकांकडून मोठ्या आमिषांना बळी पडल्याचे प्रकार होत असतात . त्यामुळे सत्य परिस्थिती लपविण्यात येऊन तालुक्यातील खाजगी तसेच राखीव वनक्षेत्रातील वृक्ष संपती तोड करुन परजिल्ह्यात व परराज्यात जात आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध वृक्षतोड, वाहतूकीवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.