(अश्विन शुद्ध दशमी, बुधवार दि. ५ ऑक्टोबर २०२२) आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, आदरणीया श्रीमती संतोष यादवजी, मंचावर उपस्थित असलेले विदर्भ प्रांताचे मा. संघचालक, नागपूर महानगराचे मा. संघचालक, अन्य पदाधिकारी वर्ग, नागरिक, माता भगिनी आणि स्वयंसेवक बंधू, नवरात्रीतील शक्तिपूजेनंतरच्या विजयोत्सवासोबत उगवणाऱ्या अश्विन शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर प्रतिवर्षानुसार विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यासाठी आज आपण जमलो आहोत. शक्तिस्वरूप जगज्जननी हाच शिवसंकल्पांच्या सिद्धीचा आधार आहे. पावित्र्य आणि शान्ति प्रस्थापित करण्यासाठी शक्तीचा आधार अपरिहार्य असतो. योगायोगाने आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या श्रीमती संतोष यादवजी या त्याच शक्ती आणि चैतन्याच्या साक्षात प्रतिनिधी आहेत. त्यांनी गौरीशंकराचे शिखर दोन वेळा सर केले आहे.
संघाच्या कार्यक्रमांमध्ये समाजातील विचारवंत आणि कर्तृत्ववान महिलांच्या उपस्थितीची परंपरा जुनीच आहे. व्यक्तिनिर्माणाची संघ आणि समितीची शाखापद्धती वेगळी असली, तरी अन्य सर्व कार्यक्रमांमध्ये महिला आणि पुरुष एकत्र येऊनच ते कार्य पार पाडतात. भारतीय परंपरेत याचा परस्परपूरक दृष्टिकोनातून विचार केला गेला आहे, याचा आपल्याला विसर पडला आणि आपण मातृशक्ती संकुचित करून टाकली. सततच्या आक्रमणांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने याला तात्कालिक मान्यता दिली आणि तीच एक सवय होऊन गेली. भारताच्या नवनिर्मितीची पहिली चाहूल लागताच आमच्या सर्व महापुरुषांनी ही रूढी नष्ट केली, आणि मातृशक्तीला देवतास्थानी बसवून तिची पूजा करणे किंवा तिला दुय्यम दर्जा देऊन स्वयंपाकघरातच बंदिस्त करून ठेवण्याऐवजी, प्रबोधन, महिलांचे सशक्तिकरण, आणि समाजक्षेत्राशी संबंधित सर्व कार्यांत महिलांना बरोबरीचे स्थान देण्यावर भर दिला आहे.
अनेक खाचखळगे पार करत, आता जगभरातील व्यक्तिवादी आणि स्त्रीवादी दृष्टीकोन बदलू लागला आहे. सन २०१७ मध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भारतीय महिलांसंदर्भात एक व्यापक व सर्वांगीण सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल सरकारकडेही सुपूर्द करण्यात आला होता. मातृशक्तीचे सशक्तीकरण, प्रबोधन आणि समान सहभागाची गरज या अहवालाने अधोरेखित केली होती. हे काम कुटुंबाच्या पातळीवर सुरू व्हावे आणि संघटनांच्या पातळीवर स्वीकारले जाऊन कार्यान्वित करावे लागेल तेव्हाच मातृशक्तीसह संपूर्ण समाज राष्ट्राच्या पुनर्निर्माण कार्यातील आपली भूमिका समर्थपणे निभावू शकेल.
पुनर्निर्माणाच्या या प्रक्रियेचा अनुभव आज सामान्य व्यक्तीलाही येऊ लागला आहे. आपल्या प्रिय भारत देशाच्या शक्ती, शील आणि जागतिक प्रतिष्ठेमध्ये सातत्याने होणारी वाढ आनंददायी आहे. सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरू रहावी यासाठी सरकारकडून निश्चित धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. जगभरात भारताचे महत्व आणि विश्वासार्हता वाढली आहे. संरक्षण क्षेत्रात देश स्वावलंबी होत आहे. कोरोनासारख्या आपत्तीकाळातून बाहेर पडून आता आपली अर्थव्यवस्थाही पूर्वपदावर येत आहे. आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आधुनिक भारताची आगेकूच कशी सुरू आहे, याचे पंतप्रधानांनी कर्तव्य-पथाच्या उद्घाटन सोहळ्यात केलेले वर्णन आपण ऐकले आहे. सरकारने निःसंदिग्धपणे हे चित्र समाजासमोर मांडणे ही निश्चितच अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल.
तथापि, या वाटचालीत आपणही तन-मन आणि कृतीपूर्वक सहभागी होण्याची गरज आहे. आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत आपल्याला आपल्या देशाचे आत्मस्वरूप, शासन, प्रशासन व समाज या सर्वांची नेमकी ओळख असायलाच हवी. या वाटचालीत प्रसंगानुरूप लवचिक भूमिका घ्यावी लागते. तरच परस्पर सामंजस्य आणि विश्वासाच्या भावनेने आगेकूच सुरू राहते. स्पष्ट विचार, समान दृष्टिकोन आणि दृढ निश्चय यांतून लवचिकपणाच्या मर्यादांचे भान स्पष्ट होते आणि चुका आणि भरकटणे टाळता येते. अशा प्रकारे शासन, प्रशासन, वेगवेगळे नेतागण, आणि समाज, सारेजण स्वार्थ आणि भेदभावरहित भावनेने कर्तव्यपथावर वाटचाल करू लागतात, तेव्हा राष्ट्र प्रगतीच्या वाटेवर सर्वात पुढे चालत राहते. शासन, प्रशासन, आणि नेते आपल्या कर्तव्याचे पालन करतीलच, पण समाजानेही आपल्या कर्तव्यांचे विचारपूर्वक पालन केले पाहिजे.
नवनिर्माणाच्या या प्रक्रियेत अजूनही काही अडथळे हेत. ते पार करावे लागतील. गतानुगतिकता हा या वाटचालीतील पहिला अडथळा आहे. बदलत्या काळासोबत माणसाच्या ज्ञानातही भर पडत असते. काळासोबत काही गोष्टी बदलतात, काही नष्ट होतात. काही नव्या गोष्टी आकाराला येतात. यासाठी जेव्हा काही नवी रचना करावयाची असते, तेव्हा परंपरा आणि समयबद्धता यांचा समन्वय साधणे गरजेचे असते. कालबाह्य बाबींचा त्याग करून नव्या युगाशी व देशासाठी सुसंगत, अनुकूल ठरणाऱ्या नव्या परंपरा प्रस्थापित कराव्या लागतात, त्याबरोबरच, आपली ओळख, संस्कृती, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या शाश्वत मूल्यांना धक्का लागणार नाही, त्यांचे श्रद्धापूर्वक आचरण केले जाईल याकरिता सजग असावे लागते.
भारताचे ऐक्य आणि प्रगती सहन न होणाऱ्या शक्ती हा नवनिर्माणाच्या प्रक्रियेतील दुसरा मोठा अडथळा आहे. चुकीच्या किंवा खोट्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करणे, अतिरेकी कारवाया करणे किंवा अशा कारवायांना प्रोत्साहन देणे समाजात भय, कलह आणि अराजकता माजविणे अशी यांची कार्यपद्धती आपण अनुभवतो आहोत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात याच शक्तींनी देशातील समाजामध्ये दुही फैलावण्याचे आणि परस्परांमध्ये शत्रुत्व पेरण्याचे काम सुरू ठेवले आहे. या शक्तींची भाषा, प्रांत, पंथ काहीही असो, पण त्यांच्या चिथावणीस बळी न पडता निर्भयपणे त्यांचा धिक्कार केला पाहिजे. त्यांच्या विघातक कारवायांचा प्रतिकार केला पाहिजे. या शक्तींना उखडून टाकण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना समाजाने साथ द्यायला हवी. कारण समाजाचे सफल आणि सबळ पाठबळच देशाची सुरक्षितता व एकात्मता अबाधित राखू शकते.
समाजाने कणखर भूमिका घेतली नाही, तर कोणतेही काम किंवा परिवर्तन यशस्वी व शाश्वत होत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. कोणतीही व्यवस्था कितीही चांगली असली, तरी लोकांना अनुकूल केल्याखेरीज किंवा लोकांनी स्वीकारल्याखेरीज ती टिकू शकत नाही.
जगभरात परिवर्तनाच्या जेवढ्या नव्या व्यवस्था अस्तित्वात आल्या किंवा आणल्या गेल्या, त्यासाठी अगोदर जनतेने त्या स्वीकाराव्यात यासाठी जागृती करावी लागली आहे. मातृभाषेतील शिक्षणव्यवस्थेस चालना दिली पाहिजे हा विचार योग्यच आहे, आणि नव्या शैक्षणिक धोरणात या दृष्टीने शासन व प्रशासन पुरेसे लक्ष देत आहे. परंतु आपल्या पाल्याने मातृभाषेतच शिकावे यासाठी पालक अनुकूल आहेत का? की, तथाकथित आर्थिक लाभ किंवा भविष्य घडविण्याच्या कल्पनांच्या मगृजळामागे मुलांना धावत ठेवण्याचीच त्यांची इच्छा आहे? मातृभाषेत शिक्षण मिळावे अशी सरकारकडून अपेक्षा करताना, आपल्यातील कितीजण मातृभाषेत स्वाक्षरी करतात, हेही पाहावे लागेल. आपल्या घरावरील नावाची पाटी तरी मातृभाषेत असले का, घरातील कोणत्याही विशेष कार्यांचे निमंत्रण तरी आपण मातृभाषेत पाठवतो का?
नवीन शैक्षणिक धोरणातून आपला पाल्य एक चांगला माणूस, सुसंकृत नागरिक होईल, त्याच्या मनात देशभक्तीची भावना रुजेल, अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. पण, समाजातील सुसंस्कृत, सुशिक्षित, संपन्न पालक तरी आपल्या पाल्यास शिकण्यासाठी शाळा-महाविद्यालांत पाठवताना याचा विचार करतात का? शिक्षण केवळ वर्गात मिळत नसते. घरात संस्कार रुजविणारे वातावरण राखण्यात पालकांची, समाजात बंधुभाव, सामाजिक शिस्तपालन इत्यादीसाठी अनुकूल वातावरण राखणाऱ्या माध्यमांची, नेत्यांची आणि सण, उत्सव, मेळाव्यांचे योजन करणाऱ्यांचीही भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे, याकडे आपले किती लक्ष आहे? ते नसेल, तर केवळ शाळेतील शिक्षण कधीही प्रभावी ठरणार नाही.
वेगवेगळ्या वैद्यकीय चिकित्सापद्धतींचा योग्य समन्वय साधून आरोग्य सेवेच्या परवडणाऱ्या गुणवत्तापूर्ण तसेच सर्वांसाठी सुलभ व नफेखोरीमुक्त अशा सुविधा सरकारने उपलब्ध करून द्याव्यात हे संघानेदेखील सुचविले आहे. सरकारच्या प्रोत्साहनातून व पाठबळामुळेच व्यक्तिगत आणि सामाजिक स्वच्छता, योगाभ्यास तसेच व्यायाम आदी उपक्रम सुरू आहेतच, समाजातही यासाठी आग्रही असणारे, त्याचे महत्व सांगणारे कितीतरी लोक आहेत. त्यांची उपेक्षा करून समाज आपल्या जुन्याच सवयी पुढे चालू ठेवणार असेल, तर कोणती आरोग्य व्यवस्था सामाजिक आरोग्य सांभाळण्यास समर्थ ठरेल?
राज्यघटनेने आपल्याला राजकीय आणि आर्थिक समानतेचा अधिकार दिला, पण समाजिक परिवर्तन प्रस्थापित झाल्याखेरीज शाश्वत आणि वास्तव परिवर्तन शक्य नाही असा इशाराही पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देऊन ठेवला होता. कालांतराने सामाजिक परिवर्तन साध्य करण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले पण विषमतेची विषवल्ली आमच्या मन आणि आचरणातून नष्ट झालेली नाही. परस्परांतील मैत्रीपूर्ण संबंध व्यक्तिगत किंवा कौटुंबिक पातळीवरील व्यवहारांतून तयार होत नाहीत, मंदिर, पाणी आणि स्मशाने जोवर सर्व हिंदूंसाठी खुली होत नाहीत, तोवर समता हे केवळ स्वप्नच राहणार आहे.
प्रशासकीय व्यवस्थेतून ज्या परिवर्तनाची अपेक्षा केली जाते, त्या परिवर्तनाचा प्रारंभ आपण आपल्या आचरणातूनही केला तर या प्रक्रियेस वेग आणि बळही मिळते. असे परिवर्तन शाश्वत असते. तसे झाले नाही, तर परिवर्तनाची प्रक्रिया खुंटते आणि परिवर्तनाची शाश्वत फळे दिसत नाहीत. म्हणून, परिवर्तन घडविण्यासाठी समाजाची विशिष्ट मानसिकता घडविणे ही पूर्वअट आहे. आपल्या सैद्धान्तिक विचारधारेशी सुसंगत असा उपभोगवादरहित आणि शोषणमुक्त विकास साधावयाचा असेल तर समाजातून आणि व्यक्तिगत जीवनातूनही भोगी प्रवृत्ती आणि शोषक वृत्तीचे समूळ उच्चाटन करावे लागेल.
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात आर्थिक नीती आणि विकासाची धोरणे रोजगाराभिमुख असली पाहिजेत ही अपेक्षा स्वाभाविक आहे. पण केवळ नोकरी म्हणजे रोजगार नाही, हा समज समाजात रुजविला पाहिजे. कोमतेही काम छोटे किंवा कमी प्रतिष्ठेचे नसते. श्रमाचे, आर्थिक किंवा बौद्धिक पातळीवरील सर्व कामांचे सारखेच महत्व आहे, हे आपण मान्य केले पाहिजे व त्यानुसार आपला व्यवहार असला पाहिजे. उद्योगशीलतेस प्रोत्साहन द्यावे लागेल. प्रत्येक जिल्ह्यात रोजगार प्रशिक्षणाच्या विकेंद्रित योजना राबवाव्या लागतील.
सरकारने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, गावोगावी विकासाच्या योजनांद्वारे शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सुविधा व्हाव्यात द्याव्यात अशा अपेक्षा व्यक्त होतच असतात. परंतु समाजाची संघटित शक्ती खूप काही करू शकते, हे कोविडकाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अनुभवले आहे. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, लघु उद्योजक, समाजातील काही धनवान मंडळी, हस्तकला क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि स्थानिक स्वयंसेवकांनी मिळून सुमारे पावणेतीनशे जिल्ह्यांमध्ये स्वदेशी जागरण मंचासोबत हा प्रयोग सुरू केला आहे. त्याच्या सुरुवातीच्या काळातच रोजगार निर्मितीमध्ये उल्लेखनीय यश मिळत असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समाजाचा सहभाग असावा हा आग्रह सरकारला जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यासाठी नाही तर राष्ट्रोत्थानाच्या कार्यातील समाजाच्या सहभागातून त्यासाठीची अनुकूल धोरणे तयार करण्यासही त्यामुळे मदत होत असते. आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे हे वास्तव आहे. पण आजकाल लोकसंख्येकडे दोन दृष्टीकोनांतून पाहिले जाते. या लोकसंख्येला जेवढ्या सुविधा आवश्यक असतात, त्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुऱ्या पडतात. त्यामुळे वाढत गेली, तर निर्माण होणारे सुविधांच्या समस्येचे ओझे असह्य होईल. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा महत्वाचा मानून त्यानुसार योजना आखल्या जातात. दुसऱ्या दृष्टिकोनानुसार, लोकसंख्येस संपत्ती मानले जाते. या सर्व लोकसंख्येचा उचित आणि अधिकाधिक वापर करून घेण्यासाठी प्रशिक्षणादी योजना विचारात घेतल्या जातात. संपूर्ण जगातील लोकसंख्या पाहता ही बाब लक्षात येते. केवळ आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास तो वेगळा ठरू शकतो.
चीनने लोकसंख्या नियंत्रण धोरण बदलून लोकसंख्यावाढीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचादेखील देशहिताच्या दृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. ५० वर्षांनंतर आजचा युवक वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत दाखल होईल, तेव्हा त्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचाही विचार आपल्याला आज करावा लागेल. जनतेच्या कठोर परिश्रमांतून देश वैभवशाली बनत असतो, आणि त्याबरोबरच वैयक्तिक व सामाजिक जीवनही सुरक्षित होत असते. जनतेचे जीवनमान, राष्ट्रीय ओळख आणि सुरक्षितता अशा अनेक अन्य विषयांशीदेखील ही बाब निगडित आहे.
मुलांची संख्या ही मातेच्या आरोग्य, आर्थिक क्षमता, शिक्षण आणि इच्छेशी आणि कुटुंबांच्या गरजांशी जोडलेला आहे. लोकसंख्येचा परिणाम पर्यावरणावरही होत असतो. थोडक्यात, या सर्व बाबी विचारात घेऊन लोकसंख्या धोरण तयार व्हायला हवे, आणि ते सर्वांसाठी समान रीतीने लागू असावयास हवे. जनजागृती करून लोकांची त्यासाठी मानसिकता तयार करावी लागेल. तरच लोकसंख्या नियंत्रणाचे नियम परिणामकारक ठरू शकतील.
सन २००० मध्ये भारत सरकारने साकल्याने विचार करून एक लोकसंख्या धोरण आखले होते. २.१ एवढा जन्मदर रहावा असे एक महत्वपूर्ण उद्दिष्ट त्याद्वारे ठरविण्यात आले होते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा दर पाच वर्षांनी प्रसिद्ध होणारा अहवाल २०२२ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सरकारचे धोरण, सामाजिक जागरुकता आणि सहभाग यांमुळे हे उद्दिष्ट साध्य तर झालेच, पण त्याहूनही कमी, म्हणजे २ एवढा जन्मदर राखण्यात यश आल्याचे हा अहवाल सांगतो. आपण लोकसंख्या नियंत्रणाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने पुढे जात आहोत, तर आणखी दोन बाबींवर विचार करावयास हवा. समाजशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिकांच्या मते, कुटुंबांचे आकारमान संकुचित झाल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या समस्या निर्माण होत असून सामाजिक तणाव. एकाकीपणा, अशी अनेक नवी आव्हानेही पुढे येऊ लागली आहेत.
त्यामुळे, कुटुंबांचे व्यवस्थापनावरच एक भलेमोठे प्रश्नचिन्ह उमटू लागले आहे. लोकसंख्येचा असमतोल हाही दुसरा एक प्रश्न आहेच. ७५ वर्षांपूर्वी या समस्येचे परिणाम आपण पाहिले आहेत. २१ व्या शतकात याच समस्येमुळे ईस्ट तिमोर, दक्षिण सुदान आणि कोसोवा हे तीन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. इंडोनेशिया, सुदान आणि सर्बियातील लोकसंख्येच्या असमतोलाचाच हा परिणाम आहे. जेव्हाजेव्हा एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हातेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात. जन्मदरातील विषमतेबरोबरच, लोभ, लालसा, सक्तीचे मतपरिवर्तन, घुसखोरी हीदेखील मोठी कारणे आहेतच. या सगळ्याच बाबी एकत्रित विचारात घ्यायला हव्यात. लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही.
लोकशाहीमध्ये समंजस सहकार्याचे महत्व सगळ्यांनाच ठाऊक आहे. समंजस सहकार्यातूनच नियम तयार होणे, ते मान्य होणे आणि त्यांचे अपेक्षित परिणाम साधणे शक्य होत असते. ज्या नियमांचे परिणाम त्वरित दिसून येतात, किंवा काही काळानंतर दिसणार असतात, ते समजावून सांगावे लागत नाहीत. पण जेव्हा देशाच्या हिताकरिता स्वार्थत्याग करायची वेळ येते, तेव्हा त्यासाठी समाजाने तयार रहावे यासाठी समाजात स्वत्त्व जागृती आणि स्वाभिमान जिवंत ठेवण्याची गरज असते. ही स्वत्त्वाची भावनाच आपणा सर्वांना एकत्र जोडते. कारण आपल्या पूर्वजांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या सत्याचा हा थेट परिणाम आहे.
‘सर्व यद्भूतं यच्च भव्यं’ ही एक शाश्वत आणि अंतप्रेरणेतून साकारलेली अभिव्यक्ती आहे. त्यामुळे आपल्या या वैशिष्ट्याचे खंबीरपणे पालन करून विविधता, वेगळेपणाचा आदर केला पाहिजे. ही बाब जगाला समजावून सांगणारा भारत हा एकमेव देश आहे. आपण सारे एक आहोत, त्यामुळे सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपल्या श्रद्धांचे वेगळेपण आपल्याला अलग करू शकत नाही. सत्य, करुणा, अंतर्बाह्य शुचिता, ही चार तत्वे सर्वांच्या एकाच प्रवासाची मार्गदर्शक आहेत. त्यांच्याच आधारे संपूर्ण जगातील जनजीवनास समन्वय, संवाद, सौहार्द आणि शांततामय वाटचालीचा संस्कार देणारी आपली संस्कृती आहे. ती सर्वांना जोडते. जगाला कुटुम्बभावाच्या नात्याने जोडण्याची प्रेरणा देते. निसर्गामुळे आपण सारेजण जगतो, आपले जीवन समृद्ध होते. यातूनच ‘जीवने यावदादानं स्यात्प्रदानं ततोSधिकम्’ ही भावना जागृत राहते. 'वसुधैव कुटुम्बकम्' आणि 'विश्वं भवत्येकं नीडम्' हे भव्य उद्दिष्ट आपल्या पुरुषार्थाची प्रेरणा आहे.
आपल्या राष्ट्रीय जीवनाचा हा सनातन प्रवाह प्राचीन काळापासून याच पद्धतीने पुढे सरकत आला आहे. काळ आणि परिस्थितीनुसार त्याचे रूप, मार्ग किंवा शैली बदलत गेली, पण मूळ विचार, ध्येय आणि उद्दिष्ट मात्र तेच आहे. या मार्गावरील वाटचालीची ही सातत्यपूर्ण गती आम्हाला आमच्या असंख्य पराक्रमी वीरांच्या शौर्य आणि समर्पणातून, असंख्य कर्मचाऱ्यांच्या भीमप्रयासातून आणि ज्ञानवंतांच्या दुर्धर तपश्चर्येतून प्राप्त झाली आहे. त्या सर्वांनाच आम्ही आपले आदर्श मानले आहे. ते आपले गौरवस्थानही आहेत, आणि हे आपले पूर्वजच आपणा सर्वांना एकत्र जोडणारा धागा आहेत.
या सर्वांनी आपल्या पवित्र मातृभूमीचे, भारतभूमीचे गुणवर्णन केले आहे. प्राचीन काळापासून सर्व प्रकारच्या विविधतांचा स्वीकार करून हातात हात घालून एकमेकांसोबत चालण्याची आमची प्रवृत्ती आहे. भौतिक सुखाच्या सर्वोच्च अनुभूतीनंतरही न थाबता अथकपणे आपल्या अंतरात्म्याचा शोध घेऊन आम्ही आपल्या अस्तित्वाचे सत्य शोधून काढले आहे. संपूर्ण जगाला आपले कुटुंब समजून आम्ही ज्ञान, विज्ञान, संस्कृती व बंधुभावाचा प्रसार केला, त्याचे कारणही आमची मातृभूमी, भारत हेच आहे. प्राचीन काळापासून सुजल, सुफळ, निर्मळ, शीतल असलेली ही भारतमाता निसर्गतः सुरक्षित अशा आपल्या चतुःसीमांमध्ये आपणा सर्वांना सुरक्षित व निश्चिंत ठेवते. या अखंड मातृभूमीची अनन्य भक्ती हाच आमच्या राष्ट्रीयत्वाचा मुख्य आधार आहे.
भूगोल, भाषा, प्रांत, पंथ, राहणीमान, सामाजिक व राजकीय व्यवस्थांमधील वैविध्य असूनही प्राचीन काळापासून आम्ही समाज, संस्कृती, राष्ट्र म्हणून एकत्र, एकाच जीवनप्रवाहाचा अविभाज्य भाग झालो आहोत. यामधील सर्व वैविध्यांचा आम्ही स्वीकार केलेला आहे. त्यांचा आम्ही आदर करतो, त्यामध्ये सुरक्षा आहे, आणि विकासही आहे. संकुचितता, कट्टरता, आक्रमकता, अहंकार याखेरीज आणखी कशाचाही यासाठी त्याग करावा लागत नाही. सत्य, करुणा, अंतर्बाह्य शुचिता व केवळ यांचीच साधना याखेरीज आणखी कशाचीच येथे सक्ती नाही. भारताची भक्ती, आमच्या समान पूर्वजांचे उज्ज्वल आदर्श आणि भारताची सनातन संस्कृती या तीन दीपस्तंभांमुळे आमच्या वाटचालीचा मार्ग उजळून निघाला आहे, आणि हातात हात घालून त्यावरून वाटचाल करणे हेच आमचे स्वत्व, हाच आमचा राष्ट्रधर्म आहे.
याच हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाला आवाहन करतो. आज याला समाजातून प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव येत आहे. अज्ञान, असत्य, द्वेष, भय, किंवा स्वार्थापोटी संघाच्या विरोधात सुरू असलेल्या अपप्रचाराचा प्रभाव आता ओसरत चालला आहे. कारण, संघ समाजात सर्वत्र पोहोचला आहे आणि संघाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. सत्याचा आवाज जगाने ऐकावयास हवा असेल, तर सत्य शक्तिशाली असावे लागते, हे एक विचित्र वास्तव आहे. या जगात दुष्ट प्रवृत्तीदेखील आहेत. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी व इतरांनाही वाचविण्यासाठी सज्जनशक्ती संघटित असणे गरजेचे आहे. याच राष्ट्रविचाराचा प्रचार, प्रसार करण्याचे काम करत संपूर्ण समाजास संघटित शक्ती म्हणून उभे करण्याचे काम संघ करत आहे, आणि हेच हिंदु संघटन आहे. कारण, या विचारालाच हिंदुराष्ट्राचा विचार म्हटले जाते, आणि ते खरेच आहे. म्हणून, हा राष्ट्रविचार मान्य असलेल्या सर्वांचा, म्हणजे हिंदू समाजाच्या संघटनाचा, हिंदू धर्म, संस्कृती व समाजाचे संरक्षण करून हिंदु राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ‘सर्वेषां अविरोधेन’ संघकार्य सुरू आहे.
आता संघाला समाजातून स्नेहभाव आणि विश्वास मिळू लागला आहे, आणि संघ शक्तिमानही झाला आहे, त्यामुळे आता संघाच्या हिंदुराष्ट्राची संकल्पना लोकांकडून गांभीर्याने ऐकून घेतली जात आहे. हाच आशय मान्य असलेले परंतु केवळ हिंदुराष्ट्र या शब्दास विरोध असणारेही काहीजण आहेत. ते या शब्दाऐवजी अन्य कोणता शब्द वापरतात. संघाचा त्याला विरोध नाही. पण ही संकल्पना सुस्पष्ट असावी यासाठी संघ मात्र, हिंदुराष्ट्र या शब्दासाठीच आग्रही राहणार आहे.
संघाकडून किंवा संघटित हिंदू समाजाकडून धोका असल्याची अकारण भीती तथाकथित अल्पसंख्यांकांमध्ये पसरविली जात आहे. असे केव्हा घडले नाही, आणि यापुढेही घडणार नाही. कारण तसा हिंदूंचा नाहीच, आणि संघाचाही स्वभाव किंवा इतिहास नाही. अन्याय, अत्याचार, द्वेषभावनेतून समाजात गुंडगिरी करणाऱ्या सामाजिक शत्रूंपासून स्वतःचे व आप्तांचे रक्षण करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असते. 'ना भय देत काहू को ना भय जानत आप l' असा सक्षम हिंदू समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे. यात कोणाला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. समाजात बंधुभाव, सभ्यता आणि शांती राखण्याकरिता संघ संपूर्ण दृढनिश्चयानिशी काम करत राहाणार आहे.
अशा काही काळजीपोटीच काही तथाकथित अल्पसंख्याकांचे काही नेते गेल्या काही वर्षांपासून भेटीगाठींसाठी येत असतात. संघाच्या काही पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संवाद झाला आहे, यापुढेही होत राहील. भारत हे प्राचीन राष्ट्र आहे, एक राष्ट्र आहे. भारताची ही ओळख व परंपरांमध्ये सहभागी होऊन आपल्या आपल्या वैशिष्ट्यांसह परस्परांसोबत राहून प्रेम, सन्मान व शांतिभावाने निस्वार्थपणे राष्ट्रसेवा करत राहू. परस्परांच्या सुखदुःखाचे साथीदार होऊ, भारताची ओळख करून घेऊ, भारतीय होऊ. हीच एकात्म, समरस राष्ट्राची संघाची संकल्पना आहे. यामध्ये संघाचा कोणताच स्वार्थ किंवा उद्देश नाही.
अलीकडेच काही दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये अत्यंत निद्य आणि ह्रदयद्रावक घटना घडली. संपूर्ण समाज हादरून गेला. अधिकांश समाज दुःखी आणि शोकमग्न होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. अशा घटनांमागे संपूर्ण समाज कधीच नसतो. त्या घटनेनंतर मुस्लिम समाजातील काही प्रमुख व्यक्तींनी निषेध नोंदविला. निषेधाची ही भावना अपवादात्मक राहू नये, तर अधिकाधिक मुस्लिम समाजाचा हा स्वभाव व्हायला हवा. अशा घटना घडल्या तर हिंदू समाजातील एक मोठा वर्ग पुढे येऊन त्याचा निषेध करतो, त्याचा विरोधही करतो.
चिथावणी कशीही असो किंवा चिथावणीखोर कोणीही असो, कायदा आणि घटनेच्या चौकटीत राहूनच सर्वांनी आपला विरोध नोंदविला पाहिजे. समाज एसकंघ राहिला पाहिजे, तेथे कलह असू नये. मन, वचन, कर्मपूर्वक हीच भावना बाळगून समाजातील सर्व सज्जनांनी व्यक्त झाले पाहिजे. आम्ही दिसावयास वेगळे होत म्हणून आम्ही वेगळे आहोत, आम्हाला वेगळे व्हायचे आहे, या देशासोबत, या देशाच्या मुख्य जीवप्रवाहासोबत, आम्ही जगू शकत नाही या खोटेपणामुळेच ‘भाई टूटे, धरती खोयी, मिटे धर्मसंस्थान’ ही फाळणीची विखारी अनुभूती आपण घेतली आहे. त्यातून कोणीच सुखी, समाधानी झालेले नाही. म्हणूनच, आम्ही भारतीय आहोत, आमचे पूर्वज भारतीय आहेत, भारताची सनातन संस्कृती आमची संस्कृती आहे, समाज आणि राष्ट्रीयत्वाचे नाते एकच आहे, हाच आमचा तारक मंत्र आहे.
स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या राष्ट्रीय नवनिर्माणाच्या प्रारंभकाळात, भारतमातेलाच आराध्य दैवत मानून कार्यरत राहण्याचे आवाहन स्वामी विवेकानंदांनी केले होते. १५ ऑगस्ट १९४७ या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी व आपल्या वाढदिवशी महर्षि अरविंदांनी देशवासीयांना दिलेल्या संदेशात पाच स्वप्नांचा उल्लेख केला होता. भारताचे स्वातंत्र्य व एकता हे त्यांचे पहिले स्वप्न होते. संविधानिक मार्गाने भारतातील संस्थानांचे विलीनीकरण होऊन भारत एकसंघपणे उभा राहिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते. पण फाळणीमुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ऐक्यभावाऐवजी एक कायमची राजकीय दरी निर्माण झाली. ही दरी भारताच्या एकात्मता, उन्नती आणि शांततेसाठी बाधा बनू शकते याची त्यांना चिंता होती. कशाही प्रकारे भारताची ही फाळणी अमान्य व्हावी आणि भारत पुन्हा अखंड भारत व्हावा अशी उत्कट इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. कारण, आशियाई देशांचे स्वातंत्र्य, जागतिक ऐक्य, भारताच्या आध्यात्मिकतेचे वैश्विकीकरण, आणि मानवोत्थान साकार करण्यात भारताची भूमिका प्रमुख राहील याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे, त्यांनी दिलेला कर्तव्याचा संदेश स्पष्ट आहे