हिमायतनगर। मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे नेतृत्व करून ज्यांनी आपली महत्वाची भूमिका बजावली. असे स्वामी रामानंद तीर्थ मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर या महान विभूतिंचा आदर्श विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावा असा होता. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ होय. त्यांची आज 03 ऑक्टोबर रोजी जयंती आहे.
त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा उजाळा व्हावा या हेतूने आपण या ठिकाणी आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जयंती साजरी करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आणि आचारांचा अभ्यास करावा. आणि त्यातूनच आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करावा. असा मोलाचा संदेश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाचे आयोजक डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक, प्राध्यापिका व कार्यालयीन कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.