पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीची तीन चिमुकल्यासह उघड्यावर जीवन जगण्यासाठी संघर्ष -NNL


नायगाव/नांदेड।
नायगाव तालुक्यातील नरंगल येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांने नापिकी आणि कर्जाला कंटाळून शनिवारी जीवनयात्रा संपविली. दिवाळीच्या तोंडावर आत्महत्या करुन घरातील कर्त्या पुरुषाने जगातून सुटका करुन घेतली असली तरी त्यांच्या पश्चात असलेल्यां पत्नीसह कुटुंबातील चिमुकल्या सदस्यांचा भाकरीसाठी संघर्ष सुरु झाला आहे. घरातील आठराविश्व दारिद्र्य आणि हालाखीची परिस्थिती पाहता पत्नीसह तीन मुलीचे भविष्य अंधकारमय झाल्याने उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 


रविवारी सर्वत्र जागतिक अन्न दिवस साजरा केला जात असून, जागतिक अन्न दिवसाच्या पुर्व संध्येला भाकरीसाठी संघर्ष करण्यात अपयश आल्याने गळफास घेवून नरंगल येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्यांने जीवनयात्रा संपवली. हा योगायोग असला तरी वास्तव हेच आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अतिवृष्टीमुळे कापसाच्या वाती तर सोयाबीनचा चिखल झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतांनाही घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ होते असल्याचा आरोप राजकीय पुढाऱ्यांनी केला आहे. 

नायगाव तालुक्यातील नरंगल येथील अल्पभूधारक शेतकरी प्रदीप पट्टेकर (३०) यांनी दि. १५ आक्टोबर रोजी दुपारी नापिकी व कर्जाला कंटाळून घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. हि एक शेतकरी आत्महत्या वाटत असली तरी घरातील कुटुंब प्रमूखाच्या अशा अचानक जाण्याने अख्खा कुटुंब उध्वस्त होते आहे. मयत शेतकरी पट्टेकर यांची काही वेगळी परिस्थिती नाही. तीन भावात चार एकर शेती मयत प्रदीप यास पत्नी व तीन मुली आहेत. बँकेचे देणे, संसाराला लागणारा खर्च, मुलींचे शिक्षण यासाठीचा अर्थिक ताळमेळ बसवणे शक्य झाले नसल्याने आत्महत्या केली असली तरी यामुळे पत्नी व तीन चिमुकल्या मुलींच्या समोर जगण्याचे मोठे संकट उभ राहिले आहे. 

प्रदीप पट्टेकर यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेली परिस्थिती पाहता मन सुन्न होत असुन, विचार करण्याची मानसिकताच राहत नाही. कारण मयत शेतकऱ्यांची पत्नी संगीता यांचे वय (२८) वर्ष तर मुलगी प्राजक्ता (७), संस्कृती (४) आणि पुनम (२) आहे. घरात आठराविश्व दारिद्र्य, रहायलाही सुस्थितीत घर नाही मग २८ वर्षाची माऊली तीन चिमुकल्यांना घेवून जगणार कशी ? संसाराचा गाडा ओढणार कुणाच्या भरवश्यावर. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने नरंगल येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दिवाळी तोंडावर आली असल्याने पत्नीला नवीन साडी व तीनही चिमुकल्यांना कपडे मिळतील आणि दिवाळीत काहीतरी गोडधोड मिळेल या अशेवर कुटुंब होत! घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेमुळे एका तरुण शेतकऱ्यांने आपली जीवन यात्रा संपवली असली तरी त्यांच्या मरणानंतर प्रश्न सुटण्याऐवजी वाढत आहेत. आणि ती सोडवणे शक्य नाही त्यामुळे भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या या कुटूंबाला उभ करण्याबरोबरच तीन चिमुकल्यांना आधार देण्यासाठी शासनाने या कुटुंबातील सदस्यांना आधार देणे गरजेचे आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी