नांदेड। महाराष्ट्रातील 0 ते २० पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्यासाठी आपण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अंदाजे 15000 हजार पेक्षा अधिक मराठी शाळा बंद होणार आहेत. त्याच बरोबर 30 हजार शिक्षक आणि 3 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शाळा बाह्य होणार आहेत. हे आकडे बघून चिंता वाढून संतप्त झालेले डी.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन चे राज्य संघटक श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून माजी आमदारांना मिळणारे पेन्शन बंद करून 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेनां द्या अशी मागणी केली आहे.
पुढे बोलताना श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील शिक्षणाचा संघर्ष अत्यंत जवळून माहित आहे. असे आम्ही समजतो. पूर्वी काही कर्मठ लोकांच्या मुळे आपण सगळे बहुजन शिक्षणापासून वंचित होतो. शिक्षण आणि ज्ञान बहुजनांच्या पर्यंत पोहोचावे म्हणून महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं आहे. हे काम करतांना त्यांना जीवघेणा संघर्ष करावा लागला आहे. पुढे छत्रपती शाहू महाराज यांनी प्रत्येक बहुजन रयत शिकली पाहिजे म्हणून कायदे केले.
आणि सक्तीने शिकवण्यासाठी संस्थानाच्या बजेट पैकी २३ % इतका खर्च शिक्षणावर केला. इतक्यावर भागेना म्हणून त्यांनी प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरु केले. शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'रयत' शिक्षण संस्था सुरु केली. संत गाडगेबाबा आणि पंजाबराव देशमुख यांचेही योगदान कुणालाच झाकता येणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने मिळालेला शिक्षणाचा वारसा टिकविण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून केलेले काम आपणास माहित आहे.
महाराष्ट्रातील थोर व्यक्तींनी केलेल्या शिक्षण संघर्षाने देशाला विकासाचा मार्ग दाखवला आहे. हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मातीचा त्याग अमुल्य आहे. आणि आपण आज या त्यागाची फळे चाखत आहोत. केंद्रासमोर स्वाभिमानाने मिरवू शकतो ते याचं कारणामुळे. या पुढेही महाराष्ट्र याचं कारणान देशावर येणारी संकटे पार करू शकतो. हा आम्हाला विश्वास वाटतो.
परंतु, ज्या कर्मठ लोकांनी हजारो वर्ष बहुजनांना शिक्षनापासून वंचित ठेवले होते, तेच लोक आज पुन्हा असा निर्णय घेण्यासाठी आपणास प्रवृत्त करत असावेत. आणि शिक्षकांच्या पगाराचा बोजा शासनावर वाढला असल्याचे कारण पुढे करत असावेत. केंद्र आणि महाराष्ट्र शासन मिळून आपल्या शिक्षणावर बजेटच्या फक्त ३.५ % इतका खर्च करते. आपण खर्च करत असलेल्या बजेटचा विचार केला तर आपल्यासमोर उभे केलेले कारण किती तकलादू आहे. हे आपल्या लक्षात येईल. आपल्याच माणसाच्या हातून आपलेच सरण रचण्याचा डाव सत्तेत आपल्या सोबत बसलेले कर्मठ सनातनी लोक अखात आहेत का? हे लक्षात घ्यावे.
आपणास आमची विनंती असेल कि, आपले मार्गदर्शक मा. अनंत दिघे यांनी आदिवासी लोकांसाठी पाड्यांवर जाऊन काम केले आहे. त्यांनी केलेले काम अजून किती जोमाने करण्याची गरज आहे. हे आपणास नुकत्याच कातकरी आदिवासी मुलांच्या मेंढपाळानी केलेल्या खरेदी विक्री प्रकरणातून लक्षात आले असेल. शिक्षणाशिवाय आपण विकासाचा राजमार्ग कुणालाच दाखवू शकत नाही. असे अनेक बहुजन समूह शिक्षणापासून कोसो दूर आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या भौतिक विकासासाठी सुरु असलेल्या मराठी शाळांची अजून गरज आहे.
फुले-शाहू-आंबेडकर-कर्मवीर-गाडगेबाबा यांच्या स्वप्नातील शिक्षण बहुजन समाज्यात अजून आले नाही. तोच आपण शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहोत. शाळा बंद करण्याच्या पापात भागीदार होऊ नका. आणि महाराष्ट्राच्या भविष्याने आपल्याही पाठीवर थाप मारावी. असे वाटल असेल तर शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या अशी विनंती विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी केली.