वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - NNL


नागपूर|
राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केली.

येथील अजनी परिसरात सेंटर रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.

 केंद्र शासनामार्फत पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे. दीपोत्सवाच्या पर्वावर हा रोजगार मेळावा देशभरातील विविध ठिकाणी आयोजित केला होता. याच कार्यक्रमात नागपूर येथे आज २१३ युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास ३८ विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. आज एकाच दिवशी देशभरात ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर देशातील विविध भागात मान्यवरांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात 10 लक्ष नोकरी भरतीचे लक्ष ठेवले आहे. राज्य शासनालाही अशावेळी मैदानात उतरावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपल्या नेतृत्वातील राज्य सरकारची तरुणांना नोकरी देणे ही प्राथमिकता असणार आहे. त्यामुळे वर्षभरात 75 हजार युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल. त्याची सुरुवात लवकरच १८ हजार युवकांची पोलीस दलामध्ये तसेच १० हजार युवकांची ग्रामविकास विभागातील भरतीद्वारे केली जाईल, असे घोषित केले.

राज्यातील खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी आहे. खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांना ज्या पद्धतीचे कौशल्य हवे आहे, त्या पद्धतीच्या कौशल्य निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्या मोठ्या संख्येने मिळाव्यात. यासाठी नोकरी देणारे व नोकरी हवे असणारे यांचे प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघ निहाय रोजगार मेळावे आयोजित करणार असल्याचे सांगितले.

यावेळी केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाच्या विशेष निमंत्रणावरून कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही संबोधित केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठविण्याची घोषणा केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने हे धाडसी पाऊल उचलल्यामूळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती ही प्रक्रिया यापुढे गतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक ऋचा खरे यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी