नांदेड। सर्वच स्थानिक रेडिओ केंद्रांचं सायंकालीन प्रसारण लवकरच पूर्ववत सुरू करू, असे आश्वासन आकाशवाणी मुंबई पश्चिम विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त महानिदेशक (कार्यक्रम) सुहास विध्वांस यांनी दिले आहे.
आकाशवाणी प्रासंगिक उद्धोषक संकलक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच मुंबई येथील एडीजी कार्यालयात सुहास विध्वांस यांना संध्याकाळच्या प्रसारण सभेतील सहक्षेपीत (रिले) कार्यक्रम बंद करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शेख हसीना, सचिव अंकुश सोनसळे, सह सचिव आनंद गोडबोले, कोषाध्यक्ष आनंद पंडीत, संघटक संचिता केळकर, नम्रता वावळे, बालाजी गवारे उपस्थित होते.
गेल्या १ जुलैपासून मध्यप्रदेश, गोवा आणि महाराष्ट्रातील स्थानिक रेडिओ केंद्रांवरून प्रसारीत होणारे कार्यक्रम बंद करून त्याऐवजी मुंबई, दिल्ली या मुख्य केंद्रांवरून प्रसारीत होणारे कार्यक्रम एलआरएस केंद्रांवरून सहक्षेपीत केले जात आहेत. स्थानिक कलावंतांबरोबरच रेडिओच्या सर्व श्रोत्यांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. आपल्या परिसरातील कला, संस्कृती आणि विचारधारा यांचा मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचाही त्रिवेणी संगम स्थानिक रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांना ऐकायला मिळायचे.
लोक संगीत, लोक जागर, घर संसार, बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जंमत, प्रासंगिक मुलाखती, शासकीय योजनाबाबत सविस्तर माहिती देणारे कार्यक्रम यासोबतच सगळयांच्या आवडीचा आणि आकाशवाणीचा सुप्रसिध्द कार्यक्रम, फोन फर्माईश, श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारीत आपली आवड, आपकी पसंद या सर्व कार्यक्रमांचा यापूर्वी संध्याकाळच्या प्रसारण सभेत समावेश होता. त्यामुळे आधुनिक सोशल मिडीयाच्या काळातही, स्थानिक रेडिओ केंद्राचे श्रोते दिवसागणीक वाढतच आहेत. कारण आता मोबाईल फोनमध्येसुध्दा स्थानिक रेडिओ ऐकता येतो. आपल्या आजूबाजुच्या परिसरातील कलावंतांना रेडीओवरून ऐकलं जायचं. तत्पुर्वी, वर्तमानपत्रातून या कार्यक्रमाची प्रसिध्दी केली जायची.
एक वेगळा आनंद आणि जिव्हाळा यातून मिळत असे. परंतू स्थानिक रेडिओचे संध्याकाळचे प्रसारणच पूर्णपणे बंद झाल्याने श्रोत्यांना या सर्व कार्यक्रमांपासून, मनोरंजन आणि प्रबोधनापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे नांदेडसह सर्वच एलआरएसवरून रेडियोचे स्थानिक प्रसारण तात्काळ सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत, आकाशवाणी उद्घोषक संकलक संघटनेच्यावतीने करण्यात आली.
दरम्यान, रेडिओ श्रोत्यांच्या व प्रासंगिक उद्घोषक, संकलकांच्या समजून घेत अतिरिक्त महानिदेशक (कार्यक्रम) सुहास विध्वांस यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली. श्रोते, आकस्मीक कर्मचारी आणि पर्मनंट स्टाफ यांच्या संयुक्त कार्यकुशलता व प्रयत्नांमुळेच आकाशवाणी टिकून आहे. आकाशवाणीशी श्रोत्यांचे अतुट नाते आहे. ते कधीही तुटणार नाही. लवकरच नांदेडसह सर्वच केंद्रांचे संध्याकाळचे स्थानिक प्रसारण पूर्ववत सुरू ठेवू, असे आश्वासन सुहास विध्वांस यांनी दिले.