उमरी, नरेंद्र येरावार। उमरी येथून मुदखेड मार्ग नांदेडकडे जाणाऱ्या राज्य रस्त्यावर गोरठा येथे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. परंतु या कामात नियोजन शून्यता असल्याने व या भागाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याने या भुयारी मार्गाचे काम गेल्या तीन महिन्यापासून बंद पडले आहे. अशा परिस्थितीत भूयारी मार्गावर पाणीच पाणी साचल्याने दुचाकी व चार चाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी भुयारी मार्गात पाणी जास्त असल्याने भोकर मार्गे नांदेडला जावे लागते. नांदेडकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर पूर्वी रेल्वेचे फाटक होते ते दिवसातून अनेक वेळा बंद होत असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होत होता.
ही अडचण दूर व्हावी, यासाठी या मार्गावर उड्डाणपूल बांधावे अशी मागणी झाली. परंतु उड्डाणपूल न बांधता भुयारी मार्ग करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आणि कामाला सुरुवात झाली. प्रारंभी पासूनच हे काम संथगतीने झाले. मात्र पहिले गुत्तेदार पळून गेल्याने दुसऱ्या गुत्तेदाराला हे काम देण्यात आले. अशा परिस्थितीतही त्यांनी प्रारंभी पासूनच हळूवार काम केल्याने पावसाळा लागला आणि काम अर्धवटच राहिले. भुयारी मार्ग करण्यात आला परंतु भुयारी मार्गात साचलेले पाणी बाहेर काढण्याची कसलीच व्यवस्था करण्यात आली नसल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी या भुयारी मार्गात तीन-चार फूट पाणी राहत असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. यंदा पावसाळ्यात या भागात मोठा पाऊस झाला परिणामी हा भुयारी मार्ग अनेक दिवस बंद पडला. भुयारी मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना नांदेडला जाण्यासाठी भोकर मार्गे जावे लागत आहे.
परिणामी अधिकचा वेळ लागत असून 20 ते 25 किलोमीटरचा ज्यादा फेरा मारावा लागतो. भुयारी मार्गाच्या कामासाठी या भागातील नागरिकांनी अनेक वेळा रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तसेच या भागाचे लोकप्रतिनिधी यांच्याकडे देखील अनेक वेळा पाठपुरावा केला असताना देखील त्यांचे या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. या भुयारी मार्गात साचलेला पाण्याचा या भागाच्या दौऱ्यावर आलेल्या लोकप्रतिनिधींना देखील फटका बसला असून या लोकप्रतिनिधीला ऐनवेळी भोकर मार्गे जावे लागले असे असताना देखील त्या लोकप्रतिनिधींनी या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने या भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.