नांदेड। क्षणाक्षणाला भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे पारडे बदलत असताना कलामंदिर नांदेड येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी लावलेल्या मोठ्या पडद्यावर सामना पाहण्यासाठी आलेल्या शेकडो क्रीडा रसिकांनी प्रचंड जल्लोषात भारताच्या विजयाचे स्वागत केले.
भाजप महानगर नांदेड व कलामंदिर ट्रस्ट तर्फे ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकातले सर्व सामने मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर मिलिंद देशमुख,जनार्दन ठाकूर,
ॲड. चैतन्यबापू देशमुख, अजयसिंह बिसेन, महेश खोमणे , अशोक पाटील धनेगावकर, अनिलसिंह हजारी, बागड्या यादव, अनिल गाजूला, रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. संचलन कामाजी सरोदे यांनी तर सुरेश लोट यांनी आभार मानले. शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद लुटण्यासाठी क्रीडा रसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्यामुळे कलामंदिर चे सभागृह खचाखच भरले होते.
प्रक्षेपण अतिशय स्पष्ट व भव्य असल्यामुळे स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद लुटत भारतातर्फे घेतलेल्या सर्व बळींच्या प्रसंगी उपस्थितांनी दाद दिली. भारताचे चार फलंदाज स्वस्तात बाद झाल्यामुळे संपूर्ण सभागृहात सन्नाटा पसरला होता. विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीने सामन्याचा रुख बदलून विजयश्री टप्प्यात आणली. शेवटच्या तीन षटकात प्रत्येक धावावर तरुण टाळ्या वाजून आनंद व्यक्त करत होते. शेवटच्या चेंडूवर विजय मिळाल्यानंतर प्रचंड घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. तिरंगे झेंडे हातात घेऊन अनेक जण उत्साहात भांगडा करत होते. सामना संपल्यानंतर कलामंदिर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष मेश्राम, प्रवीण सुनेवाड, संतोष भारती, प्रदीपसिंह हजारी, धीरज स्वामी, करण जाधव, सदाशिव कंधारे, महेंद्र शिंदे, आकाश गायकवाड, विलास जोगदंड, विजय वाडेकर यांनी परिश्रम घेतले.गुरूवार दि.२७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भारत नेदरलँड हा सामना मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्यात येणार आहे. कलामंदिर मध्ये आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.दिलीप ठाकूर व कामगार आघाडीचे सुरेश लोट यांनी केले आहे.