नांदेड, अनिल मादसवार| मनाचिये गुंती या कार्यक्रमातून नावारुपास आलेल्या प्रसिध्द निवेदक नंदकुमार बुलबुले यांचे बहारदार व मार्मिक निवेदन, झी सारे गमपचे सुप्रसिध्द गायक ज्ञानेश्वर मेश्राम व सुप्रसिध्द गायक अनिकेत सराफ यांच्या भक्ती, भाव तसेच गझल गिताने स्वप्न स्वरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज बंदाघाटवर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत दिवाळी पहाटचा देखना शुभारंभ झाला. रसिकांनी प्रत्येक गीताला भरभरुन दाद दिली.
जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा मनपा, गुरुव्दारा बोर्ड व नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून तीन दिवस दिवाळी पहाटचे कार्यक्रम सुरु झाले. गोदावरी नदीला आलेला पूर व जायकवाडीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हा कार्यक्रम गोदातटी बंदाघाटवर होतो की नाही अशी शंका २२ तारखेपर्यंत होती. मात्र प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे आज बंदाघाटवर हजारो प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. ज्ञानेश्वर मेश्राम यांनी सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, आकाश झेप घे रे, कांदा मूळा भाजी, राधे बाई चाल, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या गितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. शास्त्रीय गायनाची सूरबध्द रेलचेल आणि उत्कृष्ट गायन या वैशिष्ट्यामुळे मेश्राम यांची गाणे बहरत गेली.
प्रख्यात गायक अनिकेत सराफ यांनी निघालो घेवून दत्ताची पालखी, देव देव्हाऱ्यात नाही, अंदाज आरशाचा, होठोंसे छूलो तूम या व अशा अनेक गितांनी आपल्या मधूर आवाजातील गोडवा नांदेडच्या रसिकांना उपलब्ध करुन दिला. त्यांच्या प्रत्येक गाण्याला रसिकांनी दाद दिली. सरतेशेवटी नानक दुखीयारे नातवे या भैरवीने अनिकेत सराफ यांनी सांगता केली. प्रामुख्याने राग यमनमधील वेगवेगळ्या गितांची मेलडी सादर करुन रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. तहसीलदार किरण अंबेकर यांच्या पत्नी कांचन अंबेकर यांनी ज्ञानेश्वर यांच्यासोबत गायिलेले गोमू संगतीने हे गीत सर्वांनाच एका वेगळ्या विश्वात घेवून गेले. या व्दंद गिताला रसिकांची दाद मिळाली. यासोबतच कांचन अंबेकर यांनी रुपेरी वाळूत बनाच्या या गिताच्या माध्यमातून हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. या नव्या कलावंताची ओळख नांदेडकरांना झाली. जीवन कुलकर्णी, अजय तायडे, महेंद्र नरवडे, अमर वानखेडे आणि मंगेश जवळेकर यांनी संगीतसाथ दिली.
डॉ.मुलमुले यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने आणि निवेदनाने या कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली. सुरुवातीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रमोदकुमार शेवाळे, महापौर जयश्री पावडे, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार डी.पी.सावंत, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे बंदाघाटावर आज झालेली प्रचंड गर्दी आणि रसिकांचा उत्साह यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमाचे समन्वयक निळकंठ पाचंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष लक्ष्मण संगेवार, अॅड.गजानन पिंपरखेडे, प्रा.सुनील नेरलकर, शंतनू डोईफोडे, सुरेश जोंधळे, निळकंठ पाचंगे, आनंदी विकास, विजय जोशी, चारुदत्त चौधरी, बापू दासरी, रत्नाकर अपस्तंभ, विजय होकर्णे, वसंत मैया, उमाकांत जोशी, हर्षद शहा, विजय बंडेवार, दिपक मुळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
उद्या दिवाळी पहाटच्या दुसऱ्या सत्रात सकाळी साडेपाच वाजता प्रख्यात शास्त्रीय गायक हेमंत पेंडसे यांची सूर दिपावली या कार्यक्रमाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती प्रा.सुनील नेरलकर यांची आहे. तर निवेदन सुप्रसिध्द निवेदक श्रीकांत उमरीकर हे करणार आहेत. उद्या दि.२५ रोजी सायंकाळी बापू दासरी यांच्या निर्मितीतून गझल संध्या हा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी साडेसहा वाजता निळकंठ पाचंगे यांच्या संकल्पनेतून व डॉ.सान्वी जेठवाणी व शुभंम बिरकुरे यांच्या निर्मितीतून नृत्य तरंग हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नागरी सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.