औराळ्यामध्ये विविध विकास कामांसह वैयक्तिक लाभांच्या योजनांत गैरव्यवहार -NNL

दोषी कंत्राटी ग्रामसेवक व उपसरपंचाची प्रशासनाकडून पाठराखण ;  जिल्हापरिषदेसमोर किरण वाघमारे यांचे दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरुच.


नायगांव बा./नांदेड।
जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील औराळा येथे गांव विकासासाठीच्या विविध विकास कामांसह वैयक्तिक लाभांच्या योजनांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केल्यानंतरही दोषी कंत्राटी ग्रामसेवक आर.जी.मुदखेडे, उपसरपंच सौ.रेखा साईनाथ पांढरे व संबधितांची प्रशासनाकडून पाठराखण होत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते किरण वाघमारे यांनी  नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरील आपले आमरण उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरुच आहे. 

ग्रा.पं.औराळा येथील पदभार स्वीकारल्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक आर.जी.मुदखेडे यांनी आपल्या कार्यकाळात गांव विकासासाठी शासनाकडून मंजूर काही कामे हस्तकांकडून दर्जाहीन स्वरुपाची तर,बहुतांश कामे कागदोपत्रीच पूर्ण दाखवून याबाबतचा निधी उचलून खर्च केला.सोबतच,वैयक्तिक लाभांच्या योजना एकाच कुटूंबातील व्यक्तींना (बनावट कागदपत्रांतून विभक्त कुटुंब असल्याचे दाखवून ) अनेकदा दिलेल्या आहेत.येथिल उपसरपंच सौ.रेखा साईनाथ पांढरे यांचे एकत्रित कुटूंब असतांनाही ते विभक्त असल्याचे दाखवून साईनाथ गंगाधर पांढरे, गंगाधर हणमंत पांढरे व आनंदा गंगाधर पांढरे या तिघांनी स्वतःकडे जनावरे नसतांनाही मग्रारोहयो/मनरेगा योजनेतून जनावरांचा गोठा तसेच, शौचालय बांधकाम व वापर अनुदान व विविध योजना याबाबतचा निधी यापूर्वी कागदोपत्रीच काम पूर्ण दाखवून उचल केल्याबाबतची चौकशीसह त्यांच्यावर कारवाई प्रलंबित असतांनाच उपसरपंच पतीच्या नांवे पूनश्च दुबार शौचालय बांधकाम व वापर अनुदान मंजूर करुन घेतले आहे.

याबाबत माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती प्राप्त करुन घेऊन सदरच्या दोन्ही स्वतंत्र प्रकरणात दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी विनंतीनंतर पांढरे कुटूंबिया विरोधातील प्रकरणात अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी  उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मनरेगा विभागाचे उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांना पुनश्च स्मरणपञ दोन नुसार कार्यवाहीचे आदेश दिले होते. तर,कंत्राटी ग्रामसेवक आर.जी. मुदखेडे यांच्याबाबत चौकशीसह कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी व नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना आदेशीत केले होते.

गटविकास अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून चौकशीचा फार्स चालविला.परंतू,संबधित दोन्ही अधिकारी स्वतः वा वरिष्ठांच्या आदेशानंतरही कार्यवाही करणे टाळून दोषींना पाठीशी घालीत असल्याचा आरोप करित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी जि.प.नांदेड कार्यालयासमोर किरण वाघमारे आमरण उपोषणास बसले आहेत.परंतू,स्वतः वा वरिष्ठपातळीवरुन आदेशानंतरही  जि.प.प्रशासन दोषींवर कारवाईऐवजी त्यांची पाठराखण करित असल्याचे उपोषणकर्ते म्हणाले.

...जिल्हा परिषद प्रशासन कायद्याच्या कचाट्यात !

माहिती अधिकारातून संबधित विभागाकडूनच माहिती घेऊन पुराव्यानिशी तक्रारीनंतर नियमानुसार दोषींविरुद्ध कारवाईऐवजी जि.प.नांदेडचे प्रशासन दोषींना पाठीशी घालीत असल्याने या दोन्ही प्रकरणात दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी वा याबाबत वरिष्ठांसह मा.सक्षम न्यायालयात दाद मागण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी उपोषणकर्ते वाघमारे यांनी केल्याने जिल्हा परिषद प्रशासन चांगलेच कायद्याच्या कचाट्यात सापडले असल्याची कुजबूज जिल्हा परिषद परिसरात ऐकावयास मिळाली.

अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत!

महत्वाचे म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रशासकीय राज असल्याने बहुतांश बाबींत सद्या जणू मनमानी नोकरशाहीने कळसच गाठला असल्याच्या वाढत्या तक्रारी असून स्व व हितचिंतकांच्या हिताशिवाय अन्य बाबींत मात्र वरिष्ठ व कनिष्ठांत कागदोपत्रीच सोपस्कार सुरु असल्याने व्यथित होऊन अनेकजण पुराव्यानिशी वरिष्ठांकडे दाद मागत आहेत.परंतू,त्यांच्याकडून अनेकदा पत्र व थेट स्मरणपत्र दिल्यानंतरही कार्यवाही जैसे थे ! आहे म्हणूनच दप्तरी दिरंगाई कायद्यासह शासन नियमावली व परिपत्रकानुसार वरिष्ठांकडून प्रकरणनिहाय कर्तव्यात कसूर करित दोषींची पाठराखण करणाऱ्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे.

सरपंचापाठोपाठ उपसरपंचही लवकरच अपात्र ठरणार ?

स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या कार्यकाळात स्वतः वा कुटूंबियांनी लाभ घेणे नियमबाह्य मानले जाते.मात्र तरिही विद्यमान सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे यांनी त्याच्याच कार्यकाळात एकत्रित कुटूंब असतांनाही पती व सासूच्या नावे घरकुल तसेच,पतीच्या नावे शौचालय बांधकाम व वापर अनुदान तब्बल दोनवेळा तत्कालिन ग्रामसेवक अविनाश हाळदेवाड व कंत्राटी ग्रामसेवक आर.जी. मुदखैडे यांना हाताशी धरुन लाटले याबाबत चौकशी प्रलंबितच असून या प्रकरणात अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या तिन वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी व कार्यवाहीसाठी तब्बल दुसर्‍यांदा स्मरणपञ दिले होते. तसाच,प्रकार या प्रकरणात पून्हा एकदा आला असून यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरांना दुसर्‍यांदा स्मरणपञ मिळालेले आहे. दोन्ही तक्रारी पुराव्यानिशी  असल्याने चौकशीअंती सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे व उपसरपंच सौ.रेखा साईनाथ पांढरे ह्याही आपल्या पदासह ग्रामपंचायत सदस्यपदावर काम करण्यास अनार्ह/ अपात्र ठरु शकतात असे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी