तालुका प्रशासनाने तात्काळ नियोजन करुन लाभ धारकांना लवकर सरकारचा आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी
मुखेड, रणजित जामखेडकर। राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने सर्व राशनधारकांना १०० रुपयात दिवाळीला आनंदाचा शिधा राशन किट देण्याचे नियोजन केले व वेगवेगळ्या एजन्सीमार्फत प्रत्येक तालुक्यातील गोडाऊनला किट पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत .
मात्र वितरण एजन्सीच्या नियोजना अभावी दिवाळी ३ दिवसावर असूनही तालुक्यात राशन किट उपलब्ध झाले नसल्यामूळे तालुक्यातील ५४ हजार राशन धारकाची दिवाळी गोड होणार की नाही ? असा प्रश्न राशनधारकांत उपस्थित होत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून अंत्योदय , प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल शिधापत्रिका धारकांना ( केशरी ) साखर , पामतेल , रवा व चनादाळ हे आवश्यक चार वस्तूंच्या अन्न किटचे वितरण होणार आहे .
बाजारात अंदाजे ३०० ते ३५० रुपयांना मिळणारी ही किट सरकारमार्फत अगदी १०० रुपयांमध्ये राशनधराकाना दिली जाणार आहे . या योजनेमुळे सर्व सामन्याची दिवाळी गोड होणार असे वाटत असताना वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ नियोजनामुळे आनंदाच्या शिधेला विलंबाची बाधा झाल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील मुक्रामबाद गोडाऊनला २० हजार २४९ किलो रवा तर २० हजार १८६ लिटर पामतेल प्राप्त झाले असून येथे साखर व चनादाळ येणे बाकी आहे तर मुखेड शहरातील गोडाऊनमध्ये फक्त २९ हजार ९९ ८ लिटर पामतेल उपलब्ध झाले असून येथे रवा , साखर व चनादाळ येणे बाकी आहे . प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे तालुक्यातील राॅशन धारकांची घोर निराशा होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
५४ हजार राशन कार्ड धारकाची दिवाळी गोड होणार का ?
अंत्योदय , प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका धारकांना सरकारने १०० रुपयामध्ये साखर ,पामतेल , चनादाळ व रवा असे एक - एक किलोच्या चार वास्तू देण्यात येत आहेत . मात्र वितरण व्यवस्थेमार्फत काही वस्तूचा पुरवठा अद्याप झाला नसून हा पुरवठा लवकर होण्यासाठी मी वितरण एजन्सीच्या संपर्कात असून यातील उर्वरित वस्तू लवकरच उपलब्ध होतील. - विजयकुमार पाटे , नायब तहसिलदार , पुरवठा विभाग मुखेड.