मुद्रांक नोंदणी कार्यालय सुविधांबाबत नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी घेतला आढावा -NNL

अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश


नांदेड, अनिल मादसवार|
मुद्रांक नोंदणी कार्यालयात उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधा अधिक भक्कम कशा करता येतील यावर शासनातर्फे गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत. रजिस्ट्री, नोंदणीसाठी सर्व्हरची क्षमताही वाढविण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विजेची अडचण दूर होण्याच्या दृष्टीने पर्यायी बॅकअप वाढविण्यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गर्दी व उपलब्ध असलेली जागा याची जर सांगड घातली तर नवीन प्रशस्त जागेत स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही. नव्या जागेत अधिकाधिक चांगल्या सेवा-सुविधा मुद्रांक नोंदणी विभागातर्फे पुरविल्या जातील असे प्रतिपादन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले.  

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे समन्वय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रेडाई संघटना, वकील संघ असोसिएशन, प्लॉट विकासक यांच्या समवेत हर्डीकर यांनी चर्चा केली. नांदेड येथे दोन सबरजिस्टार ऑफिस व सह जिल्हा निबंधकाचे असलेले कार्यालय सद्यस्थितीत अपुरे आहे. या ठिकाणी इतर सेवा-सुविधा उपलब्ध करणे शक्य नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

नांदेड येथील भाड्याचे दर अधिक असल्याने पुरेशी लागणारी कार्यालयासाठी जागा शोधणे आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत क्रेडाई संघटनेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सोईच्या ठिकाणी जर उपलब्ध जागा असेल तर पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहनही श्रावण हर्डीकर यांनी केले. यावेळी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, माईनकर, सह जिल्हा निबंधक वि. प्र. बोराळकर, सहायक नगर रचनाकार वाय. के. पी पटेल, क्रीडायी संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी, उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी