नांदेड|1 ते 20 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची शासनाने माहिती मागितली असून ती माहिती फक्त जिल्ह्याने शासनाला सादर केली आहे. त्यात शाळा बंद करणे, स्थलांतर करणे करणे किंवा कोणत्याही अन्य पर्यायांची शिफारस केली नसल्याचे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी स्पष्ट केले आहे.
दि. 28 सप्टेंबर 2022 ला शासनाने सर्व जिल्ह्यांना पत्र काढून 1 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती विहित नमुन्यात मागितली होती. त्यानुसार जिल्ह्यातील अशा सर्व शाळांचा शोध घेऊन त्याची माहिती कार्यालयाने तयार केली असून, ती शासनाकडे पाठविण्यात आली आहे. याबाबत अनेक प्रवाद निर्माण झाले असून गाव पातळीवरून अनेक जण या संदर्भात विचारणा करीत आहेत, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने हे स्पष्ट केले आहे.
सद्यस्थितीत शाळा बंद करणे, शाळा स्थलांतर अशा कोणत्याही बाबीबद्दल सांगण्यात आलेले नाही. या माहिती आधारे कमी पट संख्येच्या शाळेचा जास्त पटसंखेच्या समृद्ध शाळांशी समन्वय, माहितीची देवाण-घेवाण, गुणवत्ता वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणे, या इतर अन्य बाबीही असू शकतात. जिल्ह्यांनी या शाळा समायोजित करा किंवा बंद करा अशी शिफारस केलेली नाही. जिल्ह्यात अशा 1 ते 20 च्या पट असलेल्या एकूण 324 शाळा आढळल्या आहेत.