नांदेड, अनिल मादसवार| आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्याना मिळावा यासाठी आयुष्यमान कार्ड तयार करण्याची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी मूल सिद्ध पत्रिका, आधारकार्ड अथवा अन्य शासनमान्य मूळ ओळखपत्र घेऊन संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा UTIITSL केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी यांनी केले आहे.
याबाबत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री जन आरोग्य योजना डॉ. दिपेशकुमार शर्मा अंमलबजावणी साहाय संस्थेचे विभागीय प्रमुख शरद पवार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व अंगीकृत रुग्णालय प्रमुख यांची उपस्थिती होती.
या योजनेअंतर्गत लाभार्थी हे सामाजिक, आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ट निकषानुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब आहेत. याचा लाभ कमाल मर्यादा 5 लाख रु प्रति कुटुंब प्रति वर्षात घेता येणार आहे. यासाठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ट निकषानुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी www.mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला अथवा 14555 या टोल फ्री क्रमांकावर किंवा संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा. गावनिहाय तसेच वार्ड निहाय यादीसाठी www.aapkedwarayushman.pmjay.gov.in ह्या संकेतस्थळांना भेट द्यावी.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारावर 34 विशेष श्रेणीत उपचार आहेत. त्यामध्ये 1038 उपचार पद्धती या खाजगी रुग्णालयात व 171 उपचार हे शासकीय रुग्णालायांतर्गत योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ मिळेल. यामध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजारावरील उपचार आहेत. या योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 22 हजार 63 कुटुंबांना होणार आहे. नांदेडमध्ये आजपर्यंत 78 हजार 768 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. काहीं समस्या असल्यास जिल्हा रुग्णालयातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा क्र- ९४२१८५०६७८ यांच्याशी संपर्क साधावा. आयुष्यमान कार्ड संलग्नीकृत रुग्णालयात मोफत तसेच आपले सरकार सेवा केंद्र किंवा UTIITSL केंद्र या ठिकाणी बनवून दिले जाते.