गाडीचे काच फोडून बाहेर पडल्याने चार जण सुखरूप; मुखेड तालुक्यातील घटना
मुखेड/नांदेड| लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याच्या हाडोळती येथील पाच तरुण बाऱ्हाळी येथील वलीमा कार्यक्रम आटोपून दि.19 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास गावाकडे जात असताना त्यांची कार दापकाराजा पुलावरून खाली वाहत्या नाल्यात कोसळली. यामद्धे बसलेल्या चार जणांनी गाडीचे काचा फोडून बाहेर उडी टाकून जीव वाचविला. मात्र गाडीचा चालक पाण्यात बेपत्ता झाला आहे. पोलीस, स्थानिक नागरिक, तहसीलच्या पथकांनी तसेच रेस्क्यू टीमने ही कार पाण्यातून दोरच्या साह्याने ओढून बाहेर काढली आहे. बेपत्ता चालकाचा शोध सुरू आहे.
लातुरच्या अहमदपूर येथील हाडोळती येथे राहणारे कार क्रमांक, एमएच-14 बीआर 3021 चा चालक अझहर सत्तार शेख हा आपल्या इतर चार मित्रांसोबत मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे वलीमाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री गावाकडे निघत असताना हिप्परगा शिवारात असलेल्या दापकाराजाच्या जवळ असलेल्या पुलावरून वाहत्या पाण्यात कार कोसळली.कारमधील अन्य चार जण काचा फोडून बाहेर पडल्याने सुखरूप बचावले. मात्र, चालक या अपघातात अजूनही बेपत्ता आहे. तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक विजय गोबाडे यांच्यासह रेस्क्यू टीम घटनास्थळी बेपत्ता चालकाचा शोध घेत आहेत. घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली असून मंगळवारी पहाटे ही कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे.