किनवट, माधव सूर्यवंशी| "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा" दरम्यान नागरीकांच्या प्रलंबित प्रकरणांना निकाली काढण्यासाठी किनवट नगर परिषदेच्या वतीने प्राधान्यक्रम दिल्या जाणार आहे. किनवटवाशियांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन सेवा पंधरवाड्याचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष आनंद मच्छेवार आणि प्रभारी मुख्याधिकारी डाॅ.मृणाल जाधव यांनी केले आहे.
मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई व उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय नांदेड तसेच उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा" राबविण्यात येत आहे. या सेवा पंधरवाडा कालावधीत शहरातील नागरिकांच्या जन्म प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र, मालमत्ता उतारा, थकबाकी नसल्याचा दाखला, मालमत्ता हस्तांतरण, बांधकाम मंजूर प्रमाणपत्र, नळजोडणी व नाहरकत प्रमाणपत्र अशा विविध प्रलंबित प्रकरणांना प्राधान्याक्रमाने घेतल्या जाणार आहे.
नगरवाशियांनी या सेवांच्या अनुषंगीक कागदपत्रांची तात्काळ पुर्तता करून या सेवांचा लाभ घ्यावा, तसेच उक्त कालावधीत आवश्यक असलेल्यांनी नव्याने सेवा मिळविण्याकरिता सुद्धा रितसर परिपुर्ण प्रस्ताव न.प.कार्यालयात तात्काळ सादर करावा. जेणे करुन त्या प्रस्तावावर उचीत कार्यवाही करुन या "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा" मध्ये प्रकरण निकाली काढता येईल असे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार आणि मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव यांनी आवाहन केल्याचे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे.